मुंबई : धुळे एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका वृद्ध व्यक्तीला गोमांस (Beef) बाळगल्याच्या संशयावरून काही तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी (Police) यातील आरोपींना अटकदेखील केली. मात्र, काही तासातच त्यांचा जामीन झाल्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.  यानंतर रेल्वे पोलिसांनी याबाबत अजामीनपात्र कलमे जोडल्यानंतर न्यायालयाने (Court) जामीन रद्द केला आहे.  


धुळे एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून 72 वर्षीय अश्रफ अली सय्यद हुसेन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली. या घटनेची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. मात्र अटकेनंतर काही तासांतच आरोपींना जामीन मिळाला. 


काही तासातच जामीन मंजूर  


काही तासातच आरोपींचा जामीन झाल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत चर्चा केली. आरोपींना इतक्या लवकर जामीन कसा मिळाला? असा सवालही उपस्थित करण्यात आला. तसेच विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी रेल्वे आयुक्त रवींद्र शिसवे यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून अजामीनपात्र कलमे जोडल्यात आली. 


जामीन रद्द करण्याचे आदेश


यानंतर कल्याणच्या न्यायदंडाधिकारी रेल्वे न्यायालयाने मुंबईतील 72 वर्षीय अश्रफ अली सय्यद हुसेन यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांचा जामीन रद्द केला. याबाबत मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एबीपी माझाला सांगितले की, तीन आरोपी पोलीस भरती परीक्षेसाठी मुंबईला जात होते. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये त्यांनी वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. आकाश आव्हाड, नितेश अहिर आणि जयेश मोहिते या तीन आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली. याआधी न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रति आरोपी 15 हजार रुपयांच्या जामिनावर सोडले होते. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 302 आणि 311 लागू केले, जे अजामीनपात्र आहेत, त्यानंतर न्यायालयाने जामिनाची रक्कम परत करून त्याचा जामीन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.


आणखी वाचा 


रेल्वेत वृद्धास मारहाण करणाऱ्या युवकांना लगेच जामीन, संतप्त आव्हाड पोहोचले पोलीस ठाण्यात