Anurag Thakur on Drone Pilots : भारताला जगातील ड्रोन (Drone) हब बनवण्याचा मोदी सरकारचा निर्धार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. ड्रोन क्षेत्रात दरवर्षी 6000 कोटी रुपयांच्या रोजगाराची शक्यता आहे. तरुणांना योग्य कौशल्ये आणि प्रशिक्षण दिल्यास भारत जागतिक ड्रोन हब बनू शकतो, असा दावा केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं की, आज तंत्रज्ञानामुळे जग पूर्णपणे बदलत आहे. कठीण समस्या तंत्रज्ञानामुळे क्षणात सोडवल्या जातात. आज संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पर्यटन, चित्रपट आणि मनोरंजन या क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान आवश्यक आहे.
देशातील पहिल्या ड्रोन ट्रेनिंग, ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचं उद्घाटन
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी चेन्नईमध्ये देशातील पहिल्या ड्रोन स्किलिंग आणि ट्रेनिंग व्हर्च्युअल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केलं. याशिवाय, ठाकूर यांनी चेन्नईतील गरुडा एरोस्पेसच्या उत्पादन युनिटमध्ये पहिले 1000 नियोजित ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स लाँच केले. तसेच गरुड एरोस्पेसच्या ड्रोन यात्रा 'ऑपरेशन 777' ला हिरवा झेंडा दाखवला. या ड्रोन यात्रेचा उद्देश देशातील 77 जिल्ह्यांतील विविध कृषी उपयोगांसाठी ड्रोनच्या उपयुक्ततेबद्दल लोकांना प्रबोधन करणे हा आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्यही केलं.
दरवर्षी 6000 कोटी रुपयांच्या रोजगाराची संधी
ड्रोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हटलं आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे, ड्रोनमुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 2023 पर्यंत भारताला किमान एक लाख ड्रोन वैमानिकांची गरज भासेल. अनुराग ठाकूर म्हणाले की, एक ड्रोन पायलट महिन्याला किमान 50-80 हजार कमावतो. जरी तुम्ही सरासरी काढली तरी 1 लाख युवकांना 50,000 हजार म्हणजे वर्षाला 6000 कोटी रोजगार ड्रोन क्षेत्रात निर्माण होऊ शकतात.
प्रगत आणि सुसज्ज उत्पादन, तंत्रज्ञान सुविधा
चेन्नईतील अग्नी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी येथे ड्रोन यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, 'गरुड एरोस्पेसच्या ड्रोन यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पहिल्या व्हर्च्युअल ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.' प्रगत आणि सुसज्ज उत्पादन, तंत्रज्ञान सुविधा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.