Navi Mumbai Crime : ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने नकळतपणे पैशांची मागणी करुन गंडवण्याचे प्रकार नित्याची बाब झाली आहे. मात्र थेट महापालिका आयुक्तांच्या नावानेच पैसे उकळण्याचा प्रकार पहिल्यांदा समोर आला. नवी मुंबईत (Navi Mumbai) हा प्रकार घडला. नवी मुंबई महापालिका आयुक्त (Navi Mumbai Municipal Corporation) असल्याचं भासवत इथल्या एका माजी नगरसेविकेकडे व्हॉट्सअॅप या मोबाईल मेसेजिंग अॅपवर पैशांची मागणी करण्यात आली होती. पैशांची मागणी करणाऱ्याने गुगल पेची (Google Pay) एक लिंक देखील यासाठी पाठवली होती. मात्र वेळीच हा मेसेज बनावट असल्याचा संशय आल्याने या माजी नगरसेविकेची फसवणूक टळून पैसे वाचले.


मनपा आयुक्तांच्या नावाने मेसेज आणि पैशांची मागणी 
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात वैशाली तुकाराम नाईक राहत असून त्या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या मोबाईल फोनवर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नावाने मेसेज आला होता. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला जुजबी चौकशी केली. वैशाली नाईक यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित प्रभागातील समस्यांबाबत निवेदन दिले होते. आयुक्त राजेश नार्वेकर कदाचित त्याच संदर्भात मेसेज पाठवत असतील, असं नाईक यांना वाटलें. मात्र काही वेळाने तुम्ही गुगल पे शी संलग्न आहात का? अशी विचारणा केली. यावर वैशाली नाईक यांनी होकार दिल्यावर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली आणि पाच हजार रुपये पाठवण्याची विनंती केली. 


संशय आल्याने फोन नंबरची पडताळणी केली
मनपा आयुक्त पाच हजार रुपये का पाठवायला सांगतील, मुळात आयुक्त पैसे पाठवण्यास सांगतात? असे प्रश्न वैशाली नाईक यांना पडला. संशय आल्यामुळे नाईक यांनी उत्तर देणे बंद केलं. याबाबत त्यांनी कुटुंबातील काही व्यक्तींशी चर्चा केली आणि आयुक्त राजेश नार्वेकर यांचा क्रमांकही मिळवला. नार्वेकर यांच्या नावाने चँटिंग केलेला क्रमांक आणि परिचित व्यक्तीकडून मागवलेला राजेश नार्वेकर यांचा फोन नंबर वेगवेगळा होता. तसंच हा बनावट संदेश असल्याची खात्री नाईक यांना झाली. यानंतर हा प्रकार मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कानावर घालून पैसे मागणाऱ्या व्यक्तीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचं वैशाली नाईक यांनी सांगितलं.


फसवणुकीच्या बातम्या वाचनात आल्याने पैसे वाचले
दरम्यान एखाद्या संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यानंतर बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर होण्याची प्रकार घडत असल्याच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. त्यामुळे मनपा आयुक्तांच्या नावाने पाठवलेल्या लिंकबाबत संशय आल्याने त्यावर क्लिक केलं नाही आणि पैसे वाचले, अशी प्रतिक्रिया वैशाली नाईक यांनी दिली.