मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha Election 2024) उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पक्षात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामागची नेमकी कारण काय आहेत जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. कारण छगन भुजबळ यांनी राज्यसभेचा उमेदवारी आपणास देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
विधानसभेत भुजबळांना फटका बसणार?
छगन भुजबळ यांना मुळात राज्यसभेवर जाण्याची का इच्छा होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका भुजबळांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विधानसभेपेक्षा राज्यसभेवर जाऊन पुढील ६ वर्ष आरामात काढता येतील असा प्रयत्न भुजबळांचा असल्याचे बोलले जात आहे.
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार
भुजबळांनी हीच बाब लक्षात घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपण निवडणुकीतून बाजूला जात असल्याचा निर्णय जाहीर केला होता. याला उत्तर देताना केंद्रातून उमेदवारी द्या, असं सांगून देखील राज्यातील नेते निर्णय घेत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच आपण बाजूला जात असल्याचं जाहीर केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तिघांचीच प्रॉपर्टी का?
नाशिक लोकसभेची जागा गेल्यानंतरच छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये सातत्याने महायुतीला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्यं त्यांच्याकडून आल्याचे पाहायला मिळाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचीच प्रॉपर्टी आहे की काय असे खासगीत सवाल उपस्थित केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळाली.
मराठा आरक्षणाच्या झळीपासून वाचण्याचा प्लॅन?
एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना स्वतः राज्यसभेवर जाऊन पुतण्या समीर भुजबळ यांना आमदार करायचं आहे. त्यामुळे आता उर्वरीत जी राज्यसभेची जागा आहे. ती घेण्यासाठी भुजबळ प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे खरंच भुजबळांचे आरक्षणाच्या झळीपासून वाचण्यासाठीचा प्लॅन यशस्वी होतोय का? हे लवकरच स्पष्ट होईल.
आणखी वाचा
राष्ट्रवादीमुळे लोकसभेत महायुतीला फटका बसला का? उत्तर प्रदेशचा दाखला देत छगन भुजबळांनी गणित मांडलं!