नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. नाशिकरोड परिसरात बुधवारी (8 जून) हाणामारीच्या दोन घटना घडल्या. एका डॉक्टरवर कोयत्याने हल्ला करत त्याचा मोबाईल फोन आणि पैसे चोरट्याने लुटले. तर काही हल्लेखोरांनी एका घरात घुसून व्यक्तीला जबर मारहाण केली आणि दुचाकीही जाळली. 


डॉ. अमोल पाटील असं हल्ला झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्यांना भर रस्त्यात कोयत्याने मारहाण करत त्यांच्याकडील पैसे आणि मोबाईल फोन घेऊन हल्लेखोर पसार झाले. काल (8 जून) रात्री नवीन बिटको रुग्णालयाजवळ ही घटना घडली. ओमकार पाटील हे 108 च्या रुग्णवाहिकेवरील डॉक्टर असून अॅम्ब्युलन्सची वाट बघत असताना ही घटना घडली. 


दुसऱ्या घटनेत दीपक पाईकराव या इसमाच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. घरातील साहित्याची तोडफोड करत दुचाकी जाळण्याचाही प्रयत्न केला. हातात कोयते आणि तलवारी घेऊन हल्लेखोर घरात घुसले. दरम्यान डॉक्टर अमोल पाटील आणि दीपक पाईकराव यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिकमध्ये गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांची गुन्हेगारांविरोधात सुरु असलेली विशेष मोहीम फक्त नावालाच आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे.


नाशिक परिक्षेत्रात पोलिसांची विशेष मोहीम 
दरम्यान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी जी. शेखर पाटील यांनी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळाल्याचं सांगितलं होतं. गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी शेकडो अवैध शस्त्र जप्त केलीच, त्यासोबत तडीपार, फरार आणि वॉण्टेड आरोपी/गुन्हेगारांवर कारवाई केली. डॉ बी जी शेखर पाटील यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करताना मागील सहा महिन्यात नाशिक परिक्षेत्रात पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईबाबत माहिती दिली होती.


विशेष मोहिमेतील पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील म्हणाले की, "नाशिक परिक्षेत्रात अवैध शस्त्र, तडीपार, फरार आणि वॉण्टेड आरोपींसंदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये 145 अवैध पिस्टल किंवा कट्टे, 204 काडतुसे, 2 एअर पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय 298 तलवारी, 45 सुरे आणि चाकू पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच 156 विविध गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून फरार असलेल्या 16 आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. याशिवाय 489 विविध गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपींना या मोहिमेत अटक करण्यात आली. तर 220 तडीपार आरोपी किंवा गुन्हेगार यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे."


गेल्या सहा महिन्यातील नाशिक परिक्षेत्रातील विविध कारवाया पुढीलप्रमाणे
145 अवैध पिस्टल
204 अवैध काडतुसे
2 अवैध एअर पिस्टल
298 तलवारी
45 सुरे आणि चाकू
156 विविध गुन्ह्यातील आरोपी
16 फरार आरोपींना पकडण्यात यश
489 विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक
220 तडीपार आरोपींवर कारवाई