Nashik Crime News : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नावाने बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर बनावट जाहिरात पोस्ट करून आणि आमिष दाखवून मराठा प्रवर्गात नसलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळलीये. तसेच बनावट कर्ज प्रकरण मंजूर करत अनुदान लाटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पाच जणांच्या टोळीने सुमारे 5 लाख 63 हजार 160 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सातपूर पोलिसांनी गुन्हा (Nashik Crime News) दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.
बनावट व्हॉट्सॲपवर ग्रुप खोटी जाहिरात, पाच जणांच्या टोळीकडून लाखोंचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत सातपूरच्या कार्यालयात संशयितांनी संगनमताने महामंडळाच्या संमती शिवाय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे छायाचित्र वापरून 'अण्णासाहेब पाटील' नावाचा बनावट व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर संशयितांनी महामंडळाच्या नावाने खोटी जाहिरात बनवून पोस्ट केली. या योजनेंतर्गत लाभार्थीना लाभ मिळवून देण्याचे आमिष या तिघांनी दाखवून रक्कम उकळली. अशाप्रकारे 1 लाख 80 हजार 592 रुपये लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विश्वजीत गांगुर्डे, मनोज जगताप आणि विश्वास जगताप यांच्याविरुद्ध महामंडळाच्या कार्यालयातील नोकरदार पल्लवी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
साधूंच्या वेशात तिघे आले, अन् महिलेला भुरळ घालून 20 हजारांचा ऐवज घेवून पसार झाले
नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागील गल्लीत 10 ऑगस्ट रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. साधूंच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी महिलेला भुरळ घालून तब्बल 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय. साधू वेशातील तिघे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने महिलेपर्यंत पोहोचले. त्यांच्या ‘दीक्षा’ घेण्याच्या आग्रहाला बळी पडून महिला घरातून पैसे देऊ लागली. सुरुवातीला 500 रुपये घेतल्यानंतर, त्यांनी “एक किलो तूप आणा” व “चहा पाजा” अशी मागणी केली.
या दरम्यान महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधून तिला भुरळ घालण्यात आली आणि एकूण 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन तिघे फरार झाले. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केलाय. पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आणखी वाचा