Continues below advertisement


Nashik Politics : भाजपाने (BJP) जाहीर केलेल्या नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकरणीवर घराणेशाहीचा आरोप झाल्यानं कार्यकारिणी वादात सापडली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाकडून खुलासा करण्यात आला आहे. त्यातच मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आज नाशिक मुक्कामी येणार असल्याने नाराजांची कशी समजूत काढणार? याकडे ही लक्ष लागले आहे.


कार्यकारिणी सर्व समावेशक करण्यात आली असून आमदारांच्या कुटुंबियांना यादीत स्थान देण्यात आले असले तरीही ते सक्षम असल्यानेच त्यांना यादीत स्थान देण्यात आले आहे. याआधी पदांची संख्या जास्त होती. मात्र, आता उपाध्यक्ष, सरचिटणीस पदांची संख्या कमी करण्यात आली आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही त्यांना प्रदेश, राष्ट्रीय कार्यकारणी आणि शासकीय समित्यामध्ये सामावून घेतले जाणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


तर ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख मामा राजवाडे यांना भाजपच्या शहर कार्यकारणीत कुठेच स्थान नसल्याने त्यांची राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला आहे. शिवसेनेचे महत्वाचे पद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, इथे पहिल्याच कार्यकारिणीत डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.


सुधाकर बडगुजर, मामा राजवाडेंना डावललं!


तर दुसरीकडे मामा राजवाडे यांचा प्रवेश झाला, त्यावेळी कार्यकारिणीचे काम पूर्ण झाले होते, त्यामुळे त्यांना सध्याच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नाही. सुधाकर बडगुजर यांच्याकडे देखील जबाबदारी दिली जाणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर आणि मामा राजवाडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. पक्षश्रेष्ठी उचित मानसन्मान आणि पद देतील, अशी भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे. आता भविष्यात मामा राजवाडे आणि सुधाकर बडगुजर यांना भाजपकडून कोणते पद मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


नाशिक भाजपची कार्यकारिणी


भाजपने नाशिक महानगराची 2025 ते 2028 या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीनुसार शहराध्यक्षपदी सुनील केदार यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील फरांदे, अॅड. अजिंक्य साने, दिगंबर धुमाळ, रवी पाटील, धनंजय माने, सोनाली कुलकर्णी, रोहिणी दळवी, दीपक सानप, चित्रेश वस्पटे आणि संदीप लेनकर यांना संधी देण्यात आली आहे. संघटनेत सरचिटणीस पदाला विशेष महत्त्व दिले जाते. या पदासाठी अनेक इच्छुक असतानाही सुनील देसाई, अमित घुगे, अॅड. श्याम बडोदे आणि रश्मी हिरे-बेंडाळे यांची निवड झाली. चिटणीसपदी राजेश आढाव, संतोष भोर, सोनाली दाबक यांच्यासह एकूण १० जणांची निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांची नियुक्ती झाली आहे. युवा मोर्चाचे प्रमुख प्रवीण भाटे, महिला मोर्चाच्या प्रमुखपदी स्वाती भामरे आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रमुखपदी राकेश दोंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.


नव्या कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखून सर्वसमावेशक पदभरती केल्याचा दावा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. "सर्व घटकांचा समावेश करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तथापि, या कार्यकारिणीत आ. सीमा हिरे यांची मुलगी, आ. देवयानी फरांदे यांचे दीर, ज्येष्ठ नेते विजय साने यांचा मुलगा आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पुतण्या यांच्यासारख्या अनेकांना स्थान मिळाल्याने नाराज व्यक्तींनी घराणेशाहीचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.



आणखी वाचा 


Voter List : मतदार यादीत एकाच महिलेचं तब्बल सहा वेळा नाव; नालासोपारा मतदारसंघातील प्रकाराने खळबळ, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश