Voter List : निवडणूक मतदार यादीतील (Voter List) भोंगळ कारभारावर सध्या विरोधक आक्रमक झाले आहेत. मागील आठवड्यात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदार यादीतील अनियमितता उघड केली. या प्रकरणानंतर विरोधी पक्षांचे अनेक खासदार संसदेत आणि रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मतदार यादीतील या गोंधळासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले जात आहे. सध्या एकाच नावाचे आणि एकाच फोटोचे अनेक नोंदी मतदार यादीत समोर येत आहेत. आता पालघर जिल्ह्यातील एका महिलेचे नाव तब्बल सहा वेळा यादीत आढळले आहे. त्या संबंधित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, त्या प्रत्येक नोंदीसमोर ईपीआयसी (EPIC) क्रमांक वेगवेगळा आहे. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात एकाच महिलेचं सहा वेळा नाव मतदार यादीत आढळले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघात 39 वर्षीय महिलेचं एकाच मतदारसंघांमध्ये सहा वेळा नाव पाहायला मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
यामध्ये त्या महिलेचा एका मतदान केंद्रावर पाच ठिकाणी नाव तर दुसऱ्या मतदान केंद्रावर एका ठिकाणी नाव आढळून आले आहे. समाज माध्यमांमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने निवडणूक आयोगाने याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती कळवली आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचा ठरवले असून एक अहवाल तयार केला जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेने मतदार म्हणून नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करताना इलेक्ट्रर्स फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) तातडीने मिळेल म्हणून अनावधानाने सहा वेळेस अर्ज भरल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
EPIC म्हणजे काय?
EPIC म्हणजे इलेक्टर्स फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड. हे म्हणजेच मतदान ओळखपत्रावरील क्रमांक, ज्याला EPIC क्रमांक असेही म्हटले जाते. भारत निवडणूक आयोगाकडून 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाने मतदार नोंदणी केल्यानंतर त्याला मतदार ओळखपत्र जारी केले जाते. या ओळखपत्राचा उपयोग केवळ मतदानासाठीच नव्हे, तर भारतीय नागरिक म्हणून ओळख सिद्ध करण्यासाठीही होतो. मतदार ओळखपत्र प्राप्त झालेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, तसेच विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार मिळतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या