Nashik Crime : नाफेड आणि नाशिक जिल्ह्यातील फेडरेशनकडून सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा (Onion) 35 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करून तो बाजारात चढ्या दराने विक्री करून नाफेडला तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा गंडा (Fraud) घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक (Kashinath Naik) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नाफेड कार्यालयातील कर्मचारी जयंत रमाकांत कारेकर यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ॲण्ड सप्लाय फेडरेशनने 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत नाफेडकडून सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला होता.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कांद्याची चढ्या दराने विक्री
यानंतर संशयित काशिनाथ नाईक याने गोवा फेडरेशन मार्फत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कांदा बाजारात चढ्या दराने विक्री करून नाफेडला साडेपाच कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. कांद्याची परस्पर विक्री करत जनतेची व नाफेडची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संशयित काशिनाथ नाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाफेडसह जनतेला गंडा घातल्याने हे प्रकरण शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. नाफेडने बाजारातील मूल्यांसह इतर मुद्यांनुसार कांदा विक्रीची तपासणी सुरू केली आहे. पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मद्यधुंद तरुणांची नाशिकमध्ये पोलिसांशी हुज्जत
दरम्यान, नाशिकमध्ये रात्री मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कल परिसरात आरडाओरड करत तरुण-तरुणी गोंधळ घालत असल्याची पोलिसांच्या गस्तीपथकाला माहिती मिळाली होती. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत नशेत बेभान झालेल्यांकडून भर रस्त्यावर उन्माद घालण्यात येत होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने तरुण-तरुणींना विचारणा केली असता मद्यधुंद तरुण आणि तरुणींनी पोलिसांशीच हुज्जत घालत कारवाईला विरोध केल्याचे दिसून आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या