Nashik City Link Bus : नाशिकमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. सिटीलिंक बस (Nashik City Link Bus) चालकाच्या हलगर्जीपणामुळे बस खड्ड्यात जोरात आदळली. यामुळे प्रवासी सीटवरून उडाल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. पोटाला जोरात मार बसल्याने प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी चालकाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरलीधर शांताराम शिंदे असे चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चार फेब्रुवारीला सकाळी आठ वाजेच्या सुमारास माळी दाम्पत्य हे सिटीलिंक बसने हिंगणवेढा येथून नाशिकरोडने येत होते. त्यावेळी बस गावापासून काही अंतरावर गेली असता, चालक मुरलीधर शांताराम शिंदे याने हलगर्जीपणे बस चालवित रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यातून बस नेली.
बस चालकावर गुन्हा दाखल
त्यामुळे बस आदळून प्रवासी संतोष माळी यांच्या पोटाला सीटचा भाग लागला. तर संतोष माळी यांच्या पत्नी माया यांनाही दुखापत झाली. त्यानंतर घरी आल्यानंतर संतोष माळी यांना त्रास सुरु झाला. त्यांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माळी दाम्पत्य हे हिंगणवेढे परिसरातील वीट भट्टीवर कामगार आहेत. याप्रकरणी माया माळी यांच्या फिर्यादीनुसार बसचालक मुरलीधर शांताराम शिंदे याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
हद्दपार गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा
दरम्यान, नाशिक शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी तपासणी मोहीम शहरात सुरू केली आहे. याच अनुषंगाने नाशिक शहरातील परिमंडळ 2 हद्दीमध्ये हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची तपासणी मोहीम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये एकूण 122 हद्दपार गुन्हेगारांची तपासणी केली असता तिघांवर हद्दपार नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ दोन पोलीस हद्दीतील नाशिकरोड, उपनगर, अंबड, इंदिरानगर, सातपूर, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत तपासणी मोहीम करण्यात आली. शहरात हद्दपार गुन्हेगारांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी हद्दपार गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik Crime : नाशिकमधील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक; परिसरात थरार, हल्लेखोर फरार