SSC Hindi Exam 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10 वी च्या परिक्षा 1 मार्चपासून सुरु झाल्यात. दरम्यान, अनेक परिक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला होता. दरम्यान, आता वर्धातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. दहावीचा हिंदीचा पेपर अर्ध्या तासात परिक्षा केंद्राबाहेर आलाय. सेलू येथील यशवंत विद्यालयात हा प्रकार घडलाय. 


पेपर व्हायरल झाल्याने खळबळ 


सेलू येथील यशवंत विद्यालयात इयत्ता 10 वीचे परिक्षा केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी आज (दि.9) सकाळी पेपर देण्यास सुरुवात केली. सकाळी 11 वाजता हिंदीच्या पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर अर्धा तासातच हा पेपर परिक्षा केंद्राबाहेर व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पेपर व्हायरल झाल्यामुळे हा प्रकार सर्वांच्या निदर्शनास आलाय.  


परिक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट 


वर्धाप्रमाणेच विदर्भातील आणखी एका जिल्ह्यातील कॉपीच्या केसेस समोर आल्या होत्या. चिखलीच्या वसंतराव नाईक विद्यालयावरही 10 वीचे परिक्षा केंद्र आहे. या केंद्रावर शिक्षकांसमोरच कॉपी पुरवली जात असल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शिवाय, विद्यालयाच्या इमारतीवर चढूनही काही मुलं कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले होते. 


मराठीचा पेपर 10 मिनीटांत सोशल मीडियावर व्हायरल 


इयत्ता 10 वीचा मराठीचा पेपर 1 मार्च 2024 रोजी घेण्यात आला होता. दरम्यान, या पेपरबाबतही असाच प्रकार घडला होता. 1 मार्चला सकाळी 11 वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या 10 मिनीटांत पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रत्येक परिक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असताना देखील असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. 


पेपर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल 


मराठीचा पेपरबाबतचा प्रकारही विदर्भातून समोर आला होता. यवतमाळ येथे हा प्रकार घडला होता. पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर सकाळी पेपरला सुरुवात झाल्यानंतर 10 मिनीटांत हा पेपर फुटला होता. त्यानंतर याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी पेपर व्हायरल करणाऱ्या आरोपींचा शोध घेत गुन्हे दाखल केले होते. कॉपी केसेस सातत्याने समोर येत असताना शाळेत तैनात करण्यात आलेले पथक काय करत होते? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. 


 


इतर महत्वाच्या बातम्या 


SSC Exam 2024 : कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा! बारावीनंतर आता दहावीच्या पेपरलाही कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, भरारी पथक फक्त नावालाच