Nandurbar Crime : ऊसतोड मजुरीसाठी सोलापुरात (Solapur) गेलेल्या नंदुरबारमधील (Nandurbar) कामगाराचा मनमाड इथे संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. नातेवाईकांनी अंत्यसंस्कार न करता प्रेत मिठात पुरुन ठेवलं आहे. पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसंच मुकादमासह दोन जणांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. ईश्वर सिपा वळवी असं मृत कामगाराचं नाव आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये तोंडले गावात ऊसतोड कामासाठी नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कालिबेल नावाच्या गावातून कालिबेल इथून ऑक्टोबर रोजी मनोज चव्हाण, रवी चव्हाण तसंच मुकादम आट्या वन्या वळवी हे मृत ईश्वर सिपा वळवी याच्यासह गावातील काही मजुरांना घेऊन गेले होते. परंतु तोंडले या गावात 20 ते 25 लोकांऐवजी पाच, सहा जणच मजूर होते. त्यामुळे पाच सहा जणांना ऊस (Sugarcane) कापणे, ऊसाची मोळी बांधणे, ट्रॅक्टर भरणे शक्य नसल्याने ईश्वर वळवी यांनी अजून काही मजुरांना घेऊन या तेव्हाच काम पूर्ण होतील असे मुकादम यांच्याकडे मागणी केली. परंतु मुकादम यांनी मागणी पूर्ण न करता तुम्हालाच पूर्ण काम करावं, असं सांगून जबरदस्तीने ऊस तोड करायला लावायचे.
तोंडले इथे मारहाण, मनमाडमध्ये जबरदस्तीने एसटीतून उतरवलं : कुटुंबियांचा आरोप
ऊसतोड न केल्यामुळे मुकादम आट्या वन्या वळवी, रवी चव्हाण, मनोज चव्हाण यांनी मिळून तोंडले इथेच ईश्वर वळवी आणि इतर मजुरांना मारहाण केल्याचं त्यांच्या भावाचं म्हणणं आहे. शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने ईश्वर वळवी हा घरी येत असताना मनमाड इथे 4 नोव्हेंबर रोजी रवी चव्हाण, मनोज चव्हाण, व आट्या वन्या वळवी यांनी त्याला एसटी बसमधून जबरदस्तीने उतरवलं. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला लवकर घ्यायला यावं. अशा प्रकारचे फोन ईश्वर वळवी यांनी त्यांच्या वडिलांना केला होता, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
अंत्यविधी न करता मृतदेह मिठात पुरुन ठेवला
परंतु यानंतर मनमाडमध्यचे ईश्वर वळवी याचा संशयास्पद मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता मिठात पुरुन ठेवला आहे. त्याच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करावं. तसंच या प्रकरणी तोंडलेमधील रवी चव्हाण, मनोज चव्हाण तसंच कालबेलमधील मुकादम आट्या वन्या वळवी या तिघांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
Nandurbar Crime : ऊस तोड कामगाराचा संशयास्पद मृत्यू, अंत्यविधी न करता मृतदेह मिठात पुरुन ठेवला