Nanded News Update :  नांदेडमधील उद्योजक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांकडून शहरात दहशत माजवणारे सराईत गुंड आणि गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 45 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज शहरातील एका गुंडाला पकडण्यासाठी गेल्यानंतर गुंडाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गुंड जखमी झाला आहे. संजूसिंग उर्फ राजुसिंग बावरी असे या संशयिताचे नाव आहे. 


आज संध्याकाळी नांदेड ग्रामीण पोलिसांकडून शहरात आणि ग्रामीण भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांचा शोध सुरू होता. यावेळी बावरी या गुंडाने पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. यात काही पोलीस जखमी झाले आहेत. बावरी याने पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली आहे. 


बावरी याने काही पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर तो पोलीस निरीक्षक घोरबांड यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी  घोरबांड यांनी स्वतः जवळील पिस्तूलातून आरोपीच्या पायावर गोळी झाडली. यात आरोपी बावरी हा जखमी झाला आहे. 


नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर 5 एप्रिल रोजी अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यामध्ये बियाणी व त्यांचा वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ माजलीय. या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील गुंडांची धडपकड सुरू केली आहे.


महत्वाच्या बातम्या