Nagpur News नागपूर : ढाब्यावर जेवणावरून झालेल्या किरकोळ वादातून एका ट्रक चालकाची हत्या (Crime) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur Crime ) मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ढाब्यावर जेवणावरून झालेल्या किरकोळ वादातून ढाबा मालक आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून ट्रक चालकावर चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केली.
त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह ट्रकमध्ये टाकून एका नाल्यात फेकून दिला. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करत प्रकरणातील मारेकऱ्यांना अवघ्या काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपीसह एक विधी संघर्षित बालकास अटक केली आहे.
किरकोळ वाद विकोपाला
यवतमाळ जिल्ह्यातील झरकड येथील रहिवासी असलेले अरविंद वसंतराव पंधरे (29) हे 30 जानेवारीच्या रात्री गुमथळा येथील हल्दीराम कंपनीत ट्रक भरण्याकरीता आले होते. याच परिसरात प्रफुल पौनिकर याचा ढाबा आहे. रात्री अरविंद पंधरे हे या ढाब्यावर जेवण करायला आले होते. मात्र रात्री ढाबा बंद असल्याने प्रफुलने अरविंदला ढाबा बंद असल्याने जेवण मिळणार नाही, असे सांगितले. अरविंदने ढाब्यावर शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. यांच्यातील हा वाद अधिक चिघळला आणि ढाब्यावरील उपस्थितांनी अरविंदला रोडच्या पलीकडे नेले. त्यानंतर त्यांना मारहाण करत त्याच्या मानेवर आणि पाठीवर धारदार चाकूने सपासप वार करून अरविंदची हत्या केली.
अवघ्या काही तासात मारेकऱ्यांचा शोध
हत्या केल्यानंतर कुणाला संशय येणार नाही म्हणून प्रफुल पौनिकर याने त्याचा ड्रायव्हर विजय कटरे याच्यासह अरविंदच्या पिकअपमध्ये रात्री मृतदेह घेऊन पडसाळ येथील नाल्यात तो मृतदेह फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मौदा पोलीस स्टेशनला 112 वर कॉल आला की, गुमथळा ते पडसाळ रोडवरील नाल्यात एका अनोळखी इसमाचा खून झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठत तपास सुरू केला असता मृत अरविंदच्या खिशात चावीचा गुच्छा मिळून आला. त्यात एक आयशर गाडीची चावी दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी तपसात हत्या झालेल्याची ओळख पटवून संशयितांचा सोध सुरू केला.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि गुप्त बातमीदारामार्फत तपास केला असता या प्रकरणाचे सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा लावला. तसेच प्रफुल उर्फ यश सुधीर पौनिकर, विशाल उर्फ बच्चा चक्रधर चिचुडे, विजय चिंधुलाल कटरे आणि एक विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या