Nagpur News नागपूर :  घरात चोर करत असल्याचे पाहून आरडाओरड करणाऱ्या महिलेच्या डोक्यावर इस्त्री मारून मुद्देमालासह दरोडेखोरांनी पळ काढला आहे. ही घटना काल (दि. 16)  मध्यरात्रीच्या सुमारास नवीन कामठी पोलीस  (Nagpur News) ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी (Nagpur Police)  तपासाचे चक्र गतिमान करत अवघ्या सहा तासांच्या आत आरोपीला (Crime News) गजाआड केले आहे.


अरविंद आशिष कुमरे (25, रा. खुर्सापार, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर जखमी महिलेला उपचारासाठी कामठीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याची तातडीने दखल घेऊन संशयित आरोपी अरविंदला अटक केली असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.


थेट महिलेच्या डोक्यात मारली इस्त्री 


नविन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंगला नं. 10, कंटोनमेंट एरिया कामठी येथे राहणाऱ्या अमरेंदर अजीत बेदी (66) या आपल्या घरी 16 फेब्रुवारीच्या रात्री नेहमीप्रमाणे झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री एक अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात मागील दारातून प्रवेश केला. त्यानंतर हा व्यक्ती चोरीच्या प्रयत्नात असताना अचानक आवाज झाला. या आवाजाने अमरेंदर यांना जाग आली आणि त्यांनी नेमका आवाज कुठून आला हे तपासले असता त्यांना एक अज्ञात व्यक्ती घरात चोरी करताना आढळून आला. हे बघून अमरेंदर यांना धक्क बसला आणि भयभीत होऊन त्यांनी आरडाओरड सुरू केली. दरम्यान, आपण पकडले जाऊ, या भीतीने संशयित व्यक्तीने अमरेंदर यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. अशातच घरात असलेली इस्त्री अमरेंदर यांना फेकून मारली. ही इस्त्री अमरेंदर यांच्या डोक्याला लागून त्या गंभीररित्या जखमी झाल्या आणि खाली कोसळल्या. या संधीचा फायदा घेत या अज्ञात चोरट्याला घरातून पलायन करण्यात यश आले. 


अवघ्या सहा तासांच्या आत संशयित जेरबंद


घरातील इतर सदस्यांना या प्रकाराबद्दल माहिती होताच त्यांनी तत्काळ अमरेंदर  यांच्यावर उपचार करण्यासाठी कामठीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान केले आणि यातील आरोपी अरविंद आशिष कुमरे (25, रा. खुर्सापार, ता. सावनेर) याला अवघ्या सहा तासांच्या आत जेरबंद केली.


यावेळी संशयित आरोपी अरविंद कुमरे याने घरातील 20 ते 25 हजार रुपये रोख, गळ्यातील सोन्याची आणि चांदीची चेन, मोबाईल असा ऐवज चोरी केल्याचे कबूल केले.  सध्या पोलीस या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सोबतच संशयित आरोपी अरविंद याने इतरत्रही अशा चोरी केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या