Nagpur Crime : नागपूरच्या शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावर काल (13 जुलै) रात्री घडलेली हत्येची घटना रोड रेजचा प्रकार असल्याचे नागपूर पोलिसांनी म्हटले आहे. शहारोज उर्फ सोनू खान (वय 42 वर्ष) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पेट्रोल पंपावर रिक्षातून आलेल्या टोळक्याने शहारोज खान यांची सर्वांच्या देखत हत्या केली होती. 


पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून हत्या प्रकरणात किमान सहा ते सात जणांचा समावेश होता अशी माहिती नागपूर पोलीस दलातील झोन वनचे डीसीपी लोहित मतानी यांनी दिली आहे. आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे ही घटना रोड रेजचा प्रकार असल्याचे मतानी म्हणाले. मात्र, आरोपी आणि मृत यांच्यात जुने वैमनस्य होते का याचा तपास ही आम्ही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.


काल रात्री काय घडलं?
शहारोज खान हे काल रात्री त्यांच्या कारमधून बजाजनगरवरुन शंकरनगरच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या कारला एका ऑटोरिक्षाची धडक बसली. त्यामुळे ऑटोरिक्षा चालक आणि त्यावेळी रिक्षामध्ये बसलेल्या त्याच्या मित्रांसोबत शहारोज यांचे वाद झाले. तिथून शहारोज पुढे शंकरनगर पेट्रोल पंपावर आले असता रिक्षाचालक आणि त्याचे मित्र ऑटोमध्ये बसून शंकरनगर पेट्रोल पंपावर आले. तिथे सर्वांनी शहारोज यांना घेरले आणि लाथा बुक्क्यांनी तसेच तिथे पडलेल्या गट्टू टाईल्स, दगडाने मारुन सर्वांच्या देखत शहारोजची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. तसेच पेट्रोल पंपाच्या कार्यालयात ठेवलेले डीव्हीआर सोबत घेऊन पसार झाले. 


पूर्व वैमनस्यातून हत्या?
मृत शहारोज हा नागपूरचा कुख्यात गुंड शेखू खानचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वैमानस्यातून ही घटना घडली आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2013 मध्ये शेखू खानने शंकरनगर चौकातच भाजपचे पदाधिकारी हेमंत दियेवार यांची गोळ्या घालून हत्या केली होती.


शहारोजचे कोणासोबतही वाद नव्हते : शहानवाज खान, भाऊ
दरम्यान हत्या झालेल्या शहारोजच्या भावाने जिमवरुन परत येत असताना शहारोजचे रस्त्यावर ऑटो चालकासोबत वाद झाले होते. त्यामधूनच ही घटना घडल्याचा दावा केला आहे. शहारोजचे कोणासोबतच वाद नव्हते. त्याने कायद्याचे शिक्षण घेतले होते. आमच्या घरात सर्वात जास्त शिकलेला तोच होता. जिमवरुन परत येताना पेट्रोल भरण्यासाठी शहारोज पंपावर थांबला होता. त्यावेळी त्याची हत्या झाली. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पुढील तपास करत आहेत. मारेकरी हे जवळच्याच झोपडपट्टीमधील राहणारे आहेत, अशी माहिती शहारोजचे मोठे भाऊ शहानवाज खान यांनी दिली.