Nagpur Crime News : उपराजधानी  नागपूरात  (Nagpur News) हत्यांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 21 दिवसांत 15 हत्येच्या घटना घडल्याने फेब्रुवारी महिना नागपूरसाठी हत्त्यांचा  (Nagpur Crime) महिना ठरला आहे. अशीच एक हत्येची घटना नागपूरच्या इमामवाडा परिसरात घडली आहे. यात किरकोळ वादातून बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकू भोसकून खून केला आहे. ही थरारक घटना बुधवार, 21 फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा वाजता जातरोडी येथे घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे मृताच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच त्याची हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश विठ्ठल बावणे (23, रा.जाततरोडी क्र.3, इंदिरानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेरूदादा ऊर्फ शंकर भोलासिंग राठोड (वय 52, रा.जाततरोडी क्र.३) आणि रितिक शंकर बावणे (21) अशी संशयित आरोपी बापलेकांची नावे आहेत.


पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच पित्याचे छत्र हरवले


घटनेतील मृत महेश बावणे याचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. दरम्यान, गुरुवारी त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी रात्री त्याच्या घरी पाहुण्यांची रेलचेल होती. या कार्यकमानिमित्य हातावर मेंहदी काढण्यासाठी परिसरातीलच एक तरुणी देखील आली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या शेरू राठोड याचा व्याजाने पैसे वाटण्याचा धंदा असून त्याने या तरुणीच्या आईला काही पैसे कर्ज स्वरूपात दिले होते. ही तरुणी दिसताच शेरूने तीला गाठले आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि शेरूने तिला शिवीगाळ सुरू केली. तुझ्या आईने पैसे घेतले असून ती फोन उचलत नाही. जर पैसे वेळेवर दिले नाहीस तर बघून घेईल, अशी धमकी देखील त्याने दिली. घरात कार्यक्रम असल्याने महेशने शेरूला रोखले आणि ज्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांच्या घरी जाऊन पैसे माग, कार्यक्रमात गोंधळ घालू नको. असे महेशने त्याला म्हटले. यावरून शेरू संतापला आणि तुला देखील बघून घेतो, असे म्हणत त्याने रागाचा भरात घरात जाऊन चाकू आणला आणि त्याच्यासह त्याच्या मुलाने महेशला मारहाण केली. शेरूचा मुलगा रितीकने महेशला पकडून ठेवले आणि  शेरूने त्याच्यावर चाकूने वार केले. 


मारेकरी बापाला अटक, मुलगा अद्याप फरारच


अल्पावधीतच महेश रक्तबंबाळ झाल्याने आरडाओरड झाली. भर कार्यक्रमात हा रक्तरंजीत प्रकार घडल्याने सर्वत्र एकच दहशत निर्माण झाली. हत्या केल्यानंतर मारेकरी शेरू आणि त्याचा मुलगा रितीकने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी महेशला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महेशचा भाऊ प्रणित याच्या तक्रारीवरून मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने मारेकरी शेरूला नंदनवन येथून अटक केली. तर त्याचा मुलगा अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महेशच्या पत्नीला जबर धक्का बसला. बाळाच्या जन्माअगोदर पित्याचे छत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या