Manoj Tiwary on Gautam Gambhir: बंगाल आणि टीम इंडियाकडून (Team India) खेळणारा स्टार क्रिकेटर मनोज तिवारी (Manoj Tiwary) यानं नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर तिवारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) चिडला. शतक झळकावूनही त्याला संघातून वगळण्यात आल्याचा मनात साठलेला राग तिवारीनं बोलून दाखवला. शतक झळकावूनही मला प्लेईंग इलेव्हनमधून का वगळण्यात आलं? हे मला धोनीला विचारायचं होतं, असं तिवारी म्हणाला होता. आता धोनीला फैलावर घेऊन झाल्यानंतर मनोज तिवारीनं आपला मोर्चा गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) वळवला आहे. तसेच, गंभीरनं धमकी दिल्याचा आरोपही तिवारीनं केला आहे. 


धोनीनंतर गंभीरकडे वळवला तिवारीनं मोर्चा 


टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंतर आता मनोज तिवारीनं आपला मोर्चा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे वळवला आहे. त्यानं गौतम गंभीरला थेट फैलावर घेतलं आहे. तिवारीनं एक धक्कादायक खुलासा करत गंभीरवर आरोप केले आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार गौतम गंभीरसोबत वाद झाला होता, त्यानंतर गंभीरनं तिवारीला धमकी दिली होती. तेव्हा गंभीर आणि तिवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळायचे. 2013 च्या आयपीएल हंगामात अरुण जेटली स्टेडियमवर ही घटना घडली होती. 


"मॅचनंतर बाहेर भेट, बघतो तुला" 


मनोज तिवारीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "भांडण झाल्यानंतर गंभीर मला म्हणाला की, "मॅचनंतर मला बाहेर भेट, मी तुला बघतो. आज तुझं काम संपलं" तिवारी पुढे म्हणाला की, त्यानं असं करायला नको होतं. त्यावेळी सामना कोटला मैदानात सुरू होता. तिथे पत्रकारांची गर्दीही होती. गंभीरचे शब्द सर्वांनीच ऐकले होते. 


तिवारी म्हणाला की, "मला अजूनही गंभीरसोबतच्या लढाईचा पश्चाताप होतो, कारण मी अशा लोकांपैकी नाही, जे वरिष्ठांशी भांडतात. ती घटना टाळता आली असती. माझे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, पण एका घटनेमुळे माझी बदनामी झाली. एकेकाळी गंभीरशी संबंध चांगले होते. म्हणूनच मला जास्त पश्चाताप होतो. केकेआरकडून खेळताना त्याच्याशी अनेकदा चर्चा झाली. संघात कोणाचा समावेश करायचा, हेही मी ठरवायचो. सर्व क्रिकेटपटूंचं मत घेतलं जायचं."


आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सीझन्समध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी खेळल्यानंतर मनोज तिवारी 2010 मध्ये केकेआरमध्ये सहभागी झाले. तिवारी 2012 मध्ये आयपीएलचा खिताब पटकावणाऱ्या केकेआर संघाचाही भाग होता. चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या विरोधात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये तिवारीनंच ड्वेन ब्रावोनं टाकलेल्या चेंडूवर विजयी चौकार लगावत केकेआरला आयपीएलचा खिताब पटकावून दिला होता. पण 2013 च्या मोसमात, तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरसोबत भांडण झालं होतं, त्यानंतर त्याला आयपीएल 2014 पूर्वी रिलीज करण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2024 Schedule: 10 शहरं, 17 दिवस अन् 21 सामने; 22 मार्चपासून IPL 2024 चा महासंग्राम, शेड्यूलमध्ये यंदा काय स्पेशल? A to Z माहिती