Nagpur News नागपूर : अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल (Mobiles) चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला जेरबंद करण्यात सदर पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे. शेख रियाज शेख मुजाहिद (वय 23 रा.साहिबगंज, झारखंड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 33 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या टोळीत रियाझसह आणखी पाच ते सहा सदस्यांचा समावेश आहे. ही टोळी (Nagpur Crime) अल्पवयीन मुलांना मोबाईल फोन चोरण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती तपासातून पुढे आले आहे.


अल्पवयीन मुले गर्दीत जाऊन लोकांच्या खिशातून किंवा पर्समधून मोबाइल (Nagpur News) चोरतात. पकडले गेल्यास अल्पवयीन सदस्य इतर उपस्थित असलेला प्रौढ सदस्याकडे मोबाईल देतात आणि तो गायब करतो. शिवाय कधी पकडले गेल्यास लहान असल्याने फार मोठी कारवाई होत नसल्याने या टोळीच्या सदस्यांचे धाडस अधिक बाळवले होते. मात्र पोलिसांनी पाठलाग करत या टोळीच्या म्होरक्या आसलेल्या रियाज शेख मुजाहिदला अटक केली असून इतरांचा देखील शोध पोलीस घेत आहे.   


दहा दिवसांत 40 ते 50 मोबाईलची चोरी 


प्राप्त माहितीनुसार, रियाज शेखची टोळी आठवड्यात किंवा दर दहा दिवसांत 40 ते 50 मोबाईल चोरल्यानंतर ते शहर सोडून इतरत्र पलायन करतात. त्यानंतर चोरीचे मोबाइल नेपाळ, झारखंड, बिहार आदी राज्यांत विकून ते इतर शहरात सक्रिय होतात. रियाज हा नागपूरच्या यशोधरानगर येथील गुलशन नगर येथील राकेश गजभिये यांच्या घरात भाड्याने राहत होता. साथीदारांच्या मदतीने त्याने एका आठवड्यात विविध भागांतून 33 मोबाईल चोरले असल्याचे चौकशी दरम्यान कबूल केले.


दरम्यान मोबाइल बॅगेत ठेवून तो झारखंडला जात असतांना, सदर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी बाजारात गस्त घालत असतांना, त्यांची नजर रियाजवर पडली. तो बाहेरचा माणूस असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी रियाजवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाहताच रियाज दुचाकीवरून पळू लागला. दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग करून गोवा कॉलनीजवळ त्याला पकडले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगेत 33 मोबाइल आढळून आले. सध्या पोलिसांनी रियाजला अटक केली असून त्यांच्या इतर सदस्यांबद्दल माहिती पोलीस घेत आहेत. 


मोस्ट वॉण्टेड' गुन्हेगार लतीफ अन्सारी शरण


वलनीतील युवकाच्या खुनात फरार असलेला आणि ग्रामीण पोलिसांना 'मोस्ट वॉण्टेड' घोषित केलेला कुख्यात गुन्हेगार लतीफ हफीज अन्सारी (वय 50, रा. वलनी) अखेर सावनेर न्यायालयात शरण आला आहे. न्यायालयाने खापरखेडा पोलिसांना त्याच्या अटकेचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी लतीफला अटक केली. लतीफविरुद्ध खून, हत्येचा प्रयत्न, रेतीतस्करीसह अन्य 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला मोबाइलवर मेसेज पाठविल्याने एका सरपंचाने लतीफ आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोहिब लतीफ खान (वय 22, रा. खापरखेडा) याची धारदार शस्त्रांनी वार करून निघृण हत्या केली होती. ही घटना 16 ऑगस्ट 2020 ला घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार मारेकऱ्यांना अटक केली होती. मात्र  तेव्हापासून लतीफ फरार झाला होता. त्यानंतर पोलीस त्याचा कसून शोध घेत होते, मात्र त्याने वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी दबाव वाढविला. अखेर लतीफने बुधवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले.


इतर महत्वाच्या बातम्या