Nagpur Crime News : ऑनलाइन गुंतवणुकीच्या प्रकरणात आपण सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकरण पाहिले आहे. मात्र नागपूरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली एका न्यायाधीशाची (Judge) तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. 'फॉल्कन इन्व्हाईस डिस्काउंट' असे फसवणूक (Crime News) करणाऱ्या कंपनीचे नाव असून आपल्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये, अशी दक्षता घेत फसवणूक झालेल्या न्यायाधीशांनी लगेच त्याची पोलिसांकडे तक्रार केलीय. त्यानंतर नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये फॉल्कन इन्व्हाईस डिस्काउंट या ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि त्याच्या मॅनेजर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, फसवणूक झालेल्या न्यायाधीशांचे जवळचे नातेवाईक गेल्या अनेक वर्षांपासून फॉल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या ऑनलाइन कंपनीसोबत गुंतवणुकीचे व्यवहार करत होते. त्यांना आकर्षक परतावा मिळाल्यामुळे त्या नातेवाईकाच्या सांगण्यानंतर न्यायाधीशांनीही त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीच्या वेळेला दावा करण्यात आलेला परतावा न मिळाल्यानंतर ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा सुरू करण्यात आल्याचे न्यायाधीशांच्या लक्षात आले. आणि त्यांनी लगेच त्याची तक्रार पोलिसांकडे केली.


याप्रकरणी आणखी काही जणांची फसवणूक झाली आहे का? याचा तपास सध्या नागपूर पोलीस करत आहे. तर आरोपींचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तर संभाव्य धोका लक्षात घेता अशा फसव्या आणि खोट्या योजनांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


महिलेकडून देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त


महिलेच्या दुचाकीच्या डिक्कीतून देशीकट्टा आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आर्णी रोड मार्गावरील मनदेव येथे केली. महिला ही आपल्या दुचाकीमध्ये देशीकट्टा आणि जिवंत काडतुस घेऊन यवतमाळकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रुचून महिलेची झाडाझडती घेतली असता तिच्याजवळ देशीकट्टा आढळून आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिले विरुद्ध भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या महिलेकडे हा देशीकट्टा आणि जिवंत काडतुस कुठून आले? ती कुणाला हे देणार होती? याचा तपास पोलीस करत आहे.  


हे ही वाचा