Nagpur News नागपूर : एकीकडे देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना गुन्हेगारांना पिस्तूल विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे. या कारवाईत या टोळीतील मुख्य सूत्रधारासह इतर चार जणांना अटक (Crime)करण्यात आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे. यात चार पिस्तूल आणि नऊ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या पाचही संशयित आरोपींना पोलिसांना अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे. 


4 पिस्तूलसह पाच जणांना ठोकल्या बेड्या


अंकित सुनील वाल्मीकी (वय 23 वर्ष रा.बेझनबाग), सिकंदर उर्फ शेखू सैफुद्दीन खान (वय 38 वर्ष रा.सेकोसाबाग), सनी गणेश तोमस्कर (वय 22 वर्ष, रा, बोरकर नगर, इमामवाडा) आणि आदित्य हेमराज पडोळे (वय 20 वर्ष, रा.कळमना) असे या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत. तर मुकुल समन (जबलपूर) आणि अमन खारोडे (बैतूल) हे त्यांचे इतर साथीदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकित वाल्मीकी हा या रॅकेटचा मुख्यसूत्रधार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मागील अनेक दिवसांपासून शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे.  


पिस्तूल विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद


गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या हत्या आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये पिस्तूलांचा सर्रास वापर होत असताना बघायला मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने शस्त्रास्त्रांची तस्करी इतर राज्यातून होत असल्याचे पोलिसांनी तपासतून उघड केले आहे. देशात सध्या निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अशातच शहरातील गुन्हेगारांना पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.


अशाप्रकारे सुरु होती शस्त्रांची तस्करी


या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अंकित वाल्मीकी हा शहरातील मोठ्या गुन्हेगारांना शस्त्रे पुरवत होता. तो मूळचा जबलपूरचा रहिवासी असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून नागपुरात राहत होता. त्यात तो शहरातील गुन्हेगारांच्या मागणीनुसार जबलपूरवरुन मुकुल समनला पिस्तूल आणि काडतुसे पाठवण्यास सांगायचा. मुकुलने पिस्तूल आणि काडतुसे खरेदी केल्यानंतर अंकित आदित्यला डिलिव्हरी घेण्यासाठी पाठवायचा. अशा पद्धतीने शस्त्रांची तस्करी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.


स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या पथकाची मोठी कारवाई 


या प्रकरणातील इतर साथीदार सिकंदर उर्फ शेखू हा दारू तस्कर आहे. त्याने काही काळापूर्वी अंकितकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे खरेदी केली. अंकितने एक पिस्तूल स्वत:जवळ ठेवले तर दुसरे चुलत भाऊ सनीला दिले होते. या बाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या पथकाला मिळाली असता, त्यांनी सापळा रचत या प्रकरणातील संशयित गुन्हेगारांना जेरबंद केले. ही कारवाई मेकोसाबागमध्ये एसयूव्हीमधून प्रवास करत असतांना करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या :