Nagpur Crime News कुटुंबातील किरकोळ वादातून चक्क मेहुण्याने आपल्याच जावयाची निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur Crime) बेलतारोडी पोलीस स्टेशन अंतर्गत सोमवार 11 मार्चला रात्रीच्या सुमारास घडली. रवी गलीचंद कहार (30, रा. तिनसई, छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे मृत झालेल्या युवकाचे तर अरुण अन्नू बनवारी (24, रा. गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे या प्रकरणातील मारेकरी मेहुण्याचे नाव आहे.


या प्रकरणाची माहिती मिळताच बेलतारोडी पोलिसांनी (Nagpur Police) तत्काळ घटनास्थाळ गाठले. मात्र त्यापूर्वीच यातील संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर या प्रकरणी श्याम कहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. 


कौटुंबिक वादातून चक्क मेहुण्याने जावयाला संपवले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कहार आणि अरुण बनवारी हे दोघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असून गेल्या महिन्याभरापूर्वी ते कामाच्या शोधात नागपूरात आले होते. हे दोघेही नात्याने जावई आणि मेहुणे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कामाच्या शोधत असताना त्यांना बेलतरोडी परिसरात एका निर्वाधीन इमारतीच्या  बांधकाम स्थळी नाली खोदण्याचे काम मिळाले. गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या कुटुंबियांच्या सोबत याच कामाच्या स्थळी झोपडी करून राहत होते.


दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि थोड्या वेळात त्यांचा हा शाब्दिक वाद हाणामारीत रूपांतरित झाला. त्यात चिडलेल्या अरुणने रवी याच्यावर काठीने जोरदार हल्ला केला. यात रवीला जबर मार बसल्यामुळे ते अल्पावधीतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर भयभीत झालेल्या अरुण त्याला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला. अशातच वेळेत उपचार न मिळाल्याने रवी याचा जागीच मृत्यू झाला. 


मारेकरी मेहुण्याचा शोध सुरू


त्यानंतर या प्रकरणाची माहिती बेलतारोडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत अरुणने घटनास्थळावरुन पळ काढला होता. श्याम कहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस संशयित आरोपी असलेल्या अरुणचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती देताना बेलतारोडी पोलीस म्हणाले की, या हत्येच्या घटनेची पुढील चौकशी करण्यासाठी आमचे एक पथक छिंदवाड्यासाठी रवाना झाले आहे.


तर स्थानिक पोलीस ठाण्याचे तीन पथक या प्रकरणाचा तपास करत असून यातील संशयित आरोपीचा शोध घेत आहे. प्राप्त माहितीनुसार संशयित आरोपी जवळ कुठलेही वाहन नसल्याने तो मुख्य रस्त्यावर अथवा सरकारी दारूच्या दुकानाच्या जवळपास असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लवकरच त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या