नागपूर :  ज्या बहिणीला आई-वडिलांनी लहान भावाच्या देखरेखीसाठी घरी थांबण्यास सांगितले त्याच 16 वर्षीय बहिणीने कथित प्रियकराच्या मदतीने आपल्या 12 वर्षीय भावाची हत्या केल्याचं समोर आले आहे. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दृगधामना गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी स्नेहल सोनपिंपळे नावाच्या 19 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.


लहान भावाच्या देखभाल आणि रक्षणाची जबाबदारी सोपवलेल्या बहिणीनेच आपल्या प्रियकराच्या  मदतीने त्याचा गळा आवळून हत्या केली आहे.  या चिमुकल्याचा दोष एवढाच होता की, त्याने बाहेरून अचानक घरी परतल्यानंतर 16 वर्षीय बहीण आणि तिचा 19 वर्षीय कथित प्रियकर स्नेहल सोनपिंपळे या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल दुपारी आई वडील घरात नसताना बारा वर्षीय मुलगा बहिणीच्या सांगण्यावरून परिसरातल्या किराणा दुकानात सामान आणायला गेला होता. काही वेळाने तो घरी परतला तेव्हा जवळच राहणारा स्नेहल सोनपिंपळे घरात बहिणी सोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. आपण ही बाब आई-वडिलांना सांगू असं बालकाने सांगताच त्याची बहीण आणि स्नेहलच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांनी आधी लहान भावाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नाही हे पाहून दोघांनी घरातच ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली.


या घटनेनंतर जणू काही घडलंच नाही या आविर्भावात स्नेहलजवळच असलेल्या आपल्या घरी परतला. तर बहिणीने बाहेरूनच समवयस्क मुलांच्या खेळात झालेल्या हाणामारीमध्ये जखमी होऊन आलेला भाऊ घरी येताच बेशुद्ध पडल्याचा कांगावा केला. घाबरून कामावरून परतलेल्या आईवडिलांनी मुलाला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनी बालकांचे मृतदेह पाहूनच त्याच्या गळ्याभोवतीचे निशान हत्येकडे संकेत करणारे असल्याचे ओळखले. आधी प्रेमाने आणि नंतर पोलिसी खाक्या दाखवत बहिणीची चौकशी केली असता तिने प्रियकरासह ही हत्या केल्याची कबुली दिली.


पोलिसांनी या प्रकरणी 19 वर्षीय स्नेहल सोनपिंपळेला अटक केली असून मृत बालकाच्या सोळा वर्षीय बहिणीला अल्पवयीन आरोपी म्हणून सुधारगृहात पाठवले आहे.  दरम्यान कामावर गेलेल्या आई वडिलांच्या पाठीमागे  किशोरवयीन मुलं घरी काय करतात, त्यांची पावलं चुकीच्या दिशेने आणि पुढे गुन्ह्याकडे तर वळत नाही ना  याबद्दल विचार करायला लावणारी ही घटना आहे.