Mumbai Crime News : हिंदी चित्रपटांमध्ये 'कानून के हात लंबे होते है' हा डॉयलॉग अनेकदा ऐकला असेल. या संवादाला साजेशी एक कामगिरी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे 15 वर्षे फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी या आरोपीने आपले नाव बदल होते. मात्र, त्याच्या एकाने चुकीने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीच्या हातावर असलेल्या गोंदणाने चोराला अटक करण्यात आली.
मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र असे आहे. गुन्हा घडला त्यावेळी आरोपीचे वय 48 वर्ष होते. आता आरोपी 63 वर्षांचा आहे. आरोपीविरोधात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 2008 मध्ये भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380, 34 नुसारे गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सुनावणी प्रकरणी न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला 'फरार' घोषित केले होते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांना अधिक प्रयत्न करावे लागले. फरार असलेल्या आरोपीचा फोटो हा पोलीस रेकॉर्डमध्ये नव्हता. राहत्या घरी पोलीस शोध घेण्यास वारंवार येत असल्याने आरोपी सातत्याने पत्ता बदलून राहत होता. या दरम्यानच्या काळात त्याने माहीम, कल्याण, भांडूप आणि ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी रहायचा. त्याशिवाय, स्थानिक रहिवासीदेखील त्याच्याबद्दल फारशी माहिती देत नव्हते. आरोपीचे निधन झाले अथवा तो तामिळनाडूतील गावी गेला असावा, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांकडून पोलिसांना दिली जायची असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीचा शोध असा लागला
पोलिसांना या तपासा दरम्यान आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी मोबाईल लोकेशन पाहण्यास सुरुवात केली. मोबाईल लोकेशननुसार हा एकाच ठिकाणी स्थिर राहत नसे. त्याचे मोबाईल लोकेशन हे मुंबईतील पर्यटन स्थळाचे असल्याचे आढळून आले. या जुजबी माहितीच्या आधारे आरोपी हा "मुंबई दर्शन" मार्गांवर चालकाचे काम करत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानंतर तो काम करत असलेल्या ट्रॅव्हल्स एजन्सीचा शोध पोलिसांनी घेतला.
असा रचला सापळा
आरोपी अत्यंत चतुर असल्याने त्याच्यासोबत संपर्क करून शोध घेणे जरा जिकरीचे वाटले. आरोपीला संशय आला असता तरी त्याने पळ काढला असता. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. पोलीस पथकाने दक्षिण मुंबईच्या फोर्टस्थित ट्रॅव्हल एजन्सीमध्ये त्यांची ओळख सामान्य नागरिकाप्रमाणे दिली. आपल्याला कुटुंबासमवेत मुंबई दर्शन करणार असल्याचे सांगितले. येत्या शनिवारी आपला प्लान असल्याचे सामान्य नागरिकाच्या वेशातील पोलिसांनी सांगितले. या सहलीसाठी जुना अनुभवी चालक म्हणून फरार आरोपीची मागणी त्यांनी केली. त्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात संबंधितांनी त्याला बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांना विश्वासात घेऊन खटल्याची माहिती देण्यात आली आणि फरार आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची स्वाक्षरी आणि हातावर असलेल्या गोंदणाने आरोपीची ओळख पटली. आरोपीने पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अधिवासाच्या कागदपत्रावर आडनावात देवेंद्रऐवजी 'मुदलीयार' असा बदल केलेचे दिसून आले आहे.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे आणि त्यांच्या पथकाने केली.