Mumbai Crime : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये आपल्या आईसोबत थांबलेल्या लहान मुलीचे एका व्यक्तीने अपहरण केले. शनिवारी रात्री ही घटना घडली. आईसोबत झोपलेल्या एका वर्षाच्या मुलीचे अपहरण करून रविवारी सकाळी तिला चर्चगेट येथे सोडून देण्यात आले. पोलीस अधिकारी संबंधित अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.


आईसोबत वेटिंग रूममध्ये थांबलेली मुलगी अपहरण झाल्यानंतर रविवारी पहाटे चर्चगेटला भटकत आणि रडत असताना दिसून आली. जीआरपी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.


एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, शनिवारी रात्री फरीदा अन्सारी (आई) आणि तिची एक वर्षाची मुलगी सीएसएमटीला आले आणि सीएसएमटी स्टेशनवरील वेटिंग रुममध्ये बसले होते. हे दोघे पहाटेच्या ट्रेनमधून उत्तर प्रदेशला जाणार होते, जिथे अन्सारीचे सासरचे लोक राहतात.


वेटिंग रुममध्ये ट्रेनची वाट पाहत असताना त्या महिलेने आपल्या मुलीला शेजारीच झोपवलं आणि ती झोपी गेली. रविवारी पहाटे 3 वाजता तिला जाग आली, त्यावेळी तिची एक वर्षाची लहान मुलगी तिला बाजूला दिसली नाही. अन्सारीने वेटिंग रुम आणि प्लॅटफॉर्मवर शोध घेतला पण तिला मुलगी सापडली नाही. त्यानंतर तिने पहाटे 3.15 वाजता सीएसएमटी जीआरपीशी संपर्क साधला आणि मूलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला.


एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी पथके तयार करून वेटिंग रुममधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासण्यास सुरुवात केली. पूर्ण शर्ट आणि हाफ पँट घातलेला संशयित मुलीजवळ आला आणि मुलगी झोपेत असताना तिला घेऊन गेला. संबंधित सीसीटीव्ही फुटेज रेल्वे पोलिसांच्या हाती लागले आहेत.


पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून मुलीचे आणि अपहरणकर्त्याचे फोटो हद्दीतील इतर पोलिस ठाण्यांमध्ये प्रसारित केले, त्यानंतर त्यांना काही मिनिटांतच आझाद मैदान पोलिसांकडून फोन आला. त्यांना चर्चगेट येथील एम. के. रोडवर पहाटे 2.30 वाजता मुलगी सापडले. मुलीला फूटपाथवर टाकून दिले होते. एका चौकीदाराने तिला पाहिले आणि '100' नंबर डायल केला. आझाद मैदान पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिले.


अपहरणकर्त्याने मुलाला चर्चगेट स्थानकापर्यंत नेण्याचा विचार केला असावा, परंतु गाड्या सुरू नसल्यामुळे तो ट्रेनमध्ये चढू शकला नाही, असा पोलीस अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मुलगी जागी होऊन रडायला लागली असता अपहरणकर्त्याने घाबरून तिला फूटपाथवर रडत सोडले असावे असाही संशय आहे. पोलिसांनी रविवारी मुलीला पुन्हा तिच्या आईच्या ताब्यात दिले.


संबंधित बातम्या:


Crime News:  जिवंत माणूस मृत दाखवला; विम्याच्या दाव्यापोटी एलआयसीकडून दोन कोटी लाटण्याचा प्रयत्न