Ambarnath News : "कल्याणचा पुढील खासदार मनसेच्या (MNS) मदतीशिवाय होणार नाही," असा दावा आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केला आहे. "मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की," असं राजू पाटील म्हणाले. सोबतच त्यांनी शिंदे गटातील घराणेशाही आणि पालकमंत्र्यांच्या निवडीवरही भाष्य केलं. ते अंबरनाथमध्ये बोलत होते.


अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी शुक्रवारी (30 सप्टेंबर) आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानीच्या रुपातील देवीचं दर्शन घेतलं. नुकताच राजू पाटील यांचा वाढदिवस झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केक कापून पाटील यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी राजू पाटील यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


मनसेच्या मदतीशिवाय कल्याणचा पुढचा खासदार होणार नाही, राजू पाटील यांचा दावा
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पुढची निवडणूक ठाण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली, तर खासदार व्हायला आवडेल का? असं राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले ती, 'मी आमदारकीलाही उभा राहणार नव्हतो, राजसाहेब म्हणाले म्हणून उभा राहिलो, त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर राहणार. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेची दखल घेतल्याशिवाय, मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की.


शिंदे गटात घराणेशाही नवीन नाही, 7-8 वर्षांपासून बघतोय, राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदेंना टोला
शिंदे गटाने नुकतीच युवासेनेतील पदाधिकाऱ्यांची घोषणा केली होती. यामध्ये बहुतांश पदाधिकारी मंत्री आणि आमदारांची मुलं असल्याने या नियुक्त्यांवर घराणेशाहीचा आरोप झाला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'शिंदे गटात घराणेशाही नवीन कुठेय? सात-आठ वर्षे झाली, बघतोच आहोत आपण', असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला. तसंच हा त्यांचा प्रश्न असला, तरी प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे, असं राजू पाटील म्हणाले. सध्या जी गटबाजी चालू आहे, ती दोन्ही गटांसाठी आणि महाराष्ट्राच्या पुढील भवितव्यासाठी चांगली नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.


पालकमंत्री हा स्थानिक मंत्रीच असायला हवा, पालकमंत्री निवडीवर राजू पाटील यांची नाराजी!
मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री निवडीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री हा जिल्ह्यातील स्थानिक मंत्रीच असायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारने नुकतेच पालकमंत्री जाहीर केले होते, ज्यात शंभूराज देसाई यांना ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री हा त्या जिल्ह्यातील स्थानिक मंत्री असायला हवा, पण कुठेतरी काहीतरी गडबड दिसतेय, सगळं काही व्यवस्थित चालू नसून त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला या घटना घडताना दिसत आहेत, असं राजू पाटील म्हणाले.


इतर बातम्या


Raju Patil Tweet : "आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल....आणि परवा बोटं तोंडात घालाल"; शरद पवार यांना मनसे आमदार राजू पाटील याचं उत्तर


धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर निवडणुका सोयीस्कर होण्यासाठी मंत्र्याचे दौरे; मनसे आमदार राजू पाटलांचा टोला