Mumbai Crime News: मुंबईतून (Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मालाड (Malad Crime News) परिसरात राहणाऱ्या एका महिलेची तिच्याच घरात घरकाम करणाऱ्या मुलीनं हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत महिलेला तब्बल 25 वर्षांपूर्वी एक दिव्यांग मुलगी रेल्वे स्थानकावर भेटली होती. त्यावेळी महिलेला तिच्यावर दया आली आणि ती त्या मुलीला थेट आपल्या घरी घेऊन आली होती. तेव्हापासूनच हत्या करणारी दिव्यांग मुलगी महिलेच्याच घरी राहत होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या घरात घरकाम करणाऱ्या मुलीनं आपला पती आणि मुलासोबत हत्येचा कट रचला. पैशांच्या मोहापायी तिनं महिलेची हत्या केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाने यांनी सांगितलं की, मालाडच्या न्यू लाईफ नावाच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 69 वर्षीय मारी सिलिन विल्फ्रेड डिकोस्टा यांचा 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांच्याच घरात राहणाऱ्या मोलकरणीनं हत्या केली. याप्रकरणी मोलकरणीसह तीन जणांना अटक केली आहे.
20 एप्रिल रोजी हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना वाटलं होतं की, महिलेकडे खूप पैसा आहे. त्याच मोहापायी तिघांनी मालकीणीची हत्या केली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. 20 एप्रिल रोजी वृद्ध महिलेसोबत राहणारा तिचा नातू काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्याचवेळी मोलकरीण, तिचा पती आणि मुलगा तिघेही घरात आले. त्यांनी महिलेचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांना बाथरुममध्ये घेऊन गेले आणि तिचा मृतदेह तिथेच ठेवला. सगळ्यांना महिलेचा मृत्यू बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यामुळे झाला असं वाटावं म्हणून त्यांनी तिचा मृतदेह बाथरुममध्येच ठेवला.
डीकोस्टा यांचा नातू नील रायबोलेनं घरी फोन केला, त्यावेळी कोणीही त्याचा फोन उचलला नाही. म्हणून त्यानं शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं तर डिकोस्टा बाथरुममध्ये आढळून आल्या. बाथरुममध्ये एका पाण्यानं भरलेल्या बादलीत डिकोस्टा यांचं तोंड होतं आणि त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि जवळच असलेल्या शताब्दी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यासाठी घेऊन गेले. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या नातवाची चौकशी केली. त्यावेळी नातवानं मोलकरणीवर संशय असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी सोन्याची चैन, स्मार्ट वॉच आणि मोबाईल गायब असल्याचं आढळून आलं.
तिनही आरोपींची 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यांना मास्क घातलेला एक व्यक्ती घरात शिरताना आणि परत जाताना दिसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोलकरीणही ये-जा करताना दिसत होती. पोलिसांनी मुलगा आणि पतीसमोर बसलेल्या मोलकरीण शबनमची चौकशी केली असता तिनं सर्व प्रकार सांगितला. खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केलं आहे. न्यायालयानं तिघांनाही 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Crime News: मुलीच्या मृतदेहासोबत घरात राहत होती 68 वर्षांची महिला; डिलिव्हरी बॉय आला तेव्हा...