Mumbai Crime : तुम्ही भरलेलं वीज बिल (Electricity Bill) सिस्टमध्ये अपडेट झालेलं नाही, त्यामुळे तुमचं वीज कनेक्शन बंद करण्यात येईल, असा मेसेज जर तुम्हाला आला तर वेळीच सावध व्हा. कारण अशा मेसेजच्या माध्यमातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. तुम्ही मागील महिन्यात वीज बिल भरलं आहे. परंतु ते सिस्टमला अपडेट झालं नसल्याने तुमची लाईट कट करण्यात येईल, असं सांगून या दोघांनी अनेकांची फसवणूक केली होती. मुंबईच्या (Mumbai) वांद्रे बीकेसी सायबर पोलिसांनी या दोघांना झारखंड (Jharkhand) इथून अटक केली. सचिनकुमार भरत मंडल (वय 24 वर्षे) आणि संजितकुमार सिताराम मंडल (वय 25 वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.
तक्रारदाराच्या खात्यातून 55 हजार रुपये लंपास
सुधीर भानुदास माने असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुधीर भानुदार माने यांच्या मोबाईल क्रमांकावर वीज बिलासंदर्भात मेसेज आला. तुमचं वीज बिल अपडेट नसल्यामुळे वीज कट करण्यात येईल, असा मेसेज सुधीर माने यांना 17 नोव्हेंबर रोजी आला होता. सोबतच यात मोबाईल क्रमांकही दिला होता. घाबरलेल्या माने यांनी तात्काळ मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने तुमचं बिल ऑनलाईन अपडेट करत असल्याचं सांगून त्यांना दहा रुपयांची पेमेंट लिंक पाठवून त्यावर पेमेंट करण्यास सांगितलं. सुधीर माने यांनी पेमेंट करताचा आरोपींनी त्यांचे बँक डिटेल्स मिळवले आणि खात्यातून 55 हजार रुपये काढले. बँकेतून तब्बल 55 हजार रुपये डेबिट झाल्याचं कळताच माने यांनी त्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सुधीर माने यांनी तातडीने वांद्रेमधील बीकेसी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली
आरोपींकडून WHATSPROMO या अॅपचा वापर
सुधीर माने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बिकेसी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 419, 420, 34 सह कलम 66(क), 66 (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तांत्रिक कौशल्याचे आधारे गुन्ह्याचा तपास करुन दोन्ही आरोपींना 20 नोव्हेंबर रोजी झारखंड या ठिकाणाहून अटक करण्यात आली. तसंच बीकेसी सायबर पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले एकूण सहा मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे दहा सिमकार्ड जप्त केले आहेत. गुन्हा करण्यासाठी आरोपींनी WHATSPROMO या अॅपचा वापर करुन बल्क मेसेज पाठवून भारतातील विविध भागातील नागरीकांना फसवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरु आहे.