Mumbai Crime : मुंबई (Mumbai) उपनगरातील अंधेरी (Andheri) पश्चिम भागातील उच्चभ्रू अशा लोखंडवाला परिसरात घरात घुसून चोरीचा प्रयत्न झाला. आरोपीने मुंबई महापालिकेचा अधिकारी (BMC) असल्याचं सांगत घरात घुसून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. अक्षय बाबू धोत्रे (वय 24 वर्षे) असं आरोपीचं नाव असून ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपी अक्षय धोत्रेला 20 नोव्हेंबर रोजी खार पश्चिम रेल्वे परिसरातून अटक केली.
आधी लाच मागितली, नंतर चैन स्नॅचिंगचा प्रयत्न
लोखंडवाला आयर्लंड पार्कमध्ये राहणाऱ्या मंजू जैन यांच्या घरात नुतनीकरणाचं काम सुरु होते. या दरम्यान 11 नोव्हेंबर रोजी अक्षय धोत्रे नावाच्या तरुणाने मुंबई महापालिकेच्या के वॉर्डच्या देखभाल विभागातून आल्याचं सांगून घरात प्रवेश केला. त्याने घरात सुरु असलेलं नुतनीकरणाचं काम हे बेकायदेशीर आहे असं सांगितलं. या कामावरील कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच देखील मागितली. मात्र मंजू जैन यांनी दहा हजार रुपये देण्यास नकार दिला असता आरोपी संतापला आणि त्याने मंजू जैन यांच्या गळ्यातील चैन ओढून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात काम करणारा कामगार पुढे आल्यामुळे आरोपी पळून गेला. मंजू जैन यांनी या संबंधीची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये स्वतः जाऊन दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ओशिवरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी तपासासाठी पथक बनवलं. गुप्त माहिती तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधील प्राप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी (20 नोव्हेंबर) खार रेल्वे परिसरात येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यानंतर पलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने पकडलं. ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अक्षय धोत्रेविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत दरोडा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगावमध्ये दीड महिन्यापूर्वी बोगस सीबीआय आणि पोलीस अधिकारी अटकेत
दीड महिन्यापूर्वी सीबीआय अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि लाच मागणाऱ्या चार जणांना मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. एका खासगी कंपनीत जाऊन पाच लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरुन तिघांना अटक केली तर तिथून पळ काढलेल्या एका आरोपीला पाठलाग करुन ताब्यात घेतलं होतं. बिझनेससाठी कर्ज घेणाऱ्यांना ही टोळी फसवत असे. ही टोळी सुरुवातीला लोकांना कर्ज देण्याचं वचन द्यायची. नंतर कर्ज मंजूर करण्याच्या नावावर रोख रकमेची मागणी करायची. संबंधित व्यक्ती कॅश देण्यासाठी तयार झाल्यानंतर रोख रक्कम दिल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकवू असं म्हणत ही गँग त्यांच्याकडून लाच मागत असे.