Mumbai Crime : खंडणीसाठी मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण (Kidnap) करणाऱ्या सात आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली आहे. अपहरण झाल्याच्या घटनेनंतर अवघ्या 13 तासातच पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हॉटेल व्यवसायिकाची सुखरुप सुटका केली आहे. अनुप शेट्टी (वय 45 वर्षे) असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी ठाण्यातील (Thane) शहापूर इथून त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.


बिझनेस पार्टनरनेच अपहरण घडवून आणलं


अंधेरी पूर्व भागातील अंधेरी-कुर्ला रोडवर अनुप शेट्टी यांचे वीरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल आहे. यात विजय ओखीरकर (वय 42 वर्षे) हा त्यांचा व्यावसायिक भागीदार म्हणून होता. मात्र भागीदारीत वाद निर्माण झाल्यामुळे विजय ओखीरकर याने आपले अडीच लाख रुपये शेट्टी यांच्याकडे पुन्हा मागितले. मात्र अनुप शेट्टी हे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. याच रागातून काल (24 एप्रिल) फिल्मी स्टाईलने दुपारी तीन वाजता हॉटेल वीरा रेसिडेन्सी हॉटेलजवळ अनुप शेट्टी यांच्यावर गोळीबार करुन त्यांना धमकावत इनोव्हा गाडीत जबरदस्तीने टाकून सात जणांनी त्यांच्या अपहरण केले. फोनवरुन त्यांच्या कुटुंबियांकडे खंडणीची मागणी केली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एकूण बारा पथके तयार करुन अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.


पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींच्या मुसक्या आवळल्या


अपहरणकर्त्यांच्या मागावर ठाण्यातील शहापूरच्या दिशेने पोलिसांची पथके रवाना झाली. अपहरणकर्ते शहापूर परिसरात असल्याचं समजताच पोलिसांनी शहापूर भागातील रस्त्यावर वाहने आडवी लावून अपहरणकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये पोलिसांच्या गाड्या आपल्या इनोव्हा गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून अपहरणकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरी देखील अपहरणकर्त्यांनी गाडी पुढे नेण्यासाठी खटाटोप केला. अखेरीस पोलिसांनी आपल्या जवळील बंदुका काढून अपहरणकर्त्यांवर रोखल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण आले आणि अपहृत हॉटेल व्यवसायिकाची सुखरुप सुटका केली.


दरम्यान दिवसाढवळ्या मुंबईसारख्या शहरात हॉटेल व्यावसायिकाच्या अपहणाच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं समोर आलं. मुंबईत नेमकं काय चाललंय हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. गुन्हेगारी घटना घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 


संबंधित बातमी


मुंबईत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; अंधेरी-कुर्ला रोडवर फिल्मी स्टाईल गोळीबार करुन हॉटेल मालकाचे अपहरण