Mumbai Crime News:  मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर उभ्या असलेल्या तरुणीचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या तरुणाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी (Borivali Railway Police) अटक केली आहे. पोलिसांनी विरारमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरुणीने या प्रकरणाची पीडित तरुणीने कुटुंबीयांसोबत बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात (Borivali Railway Police Station) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. 


मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरून परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणाची बोरिवली लोहमार्ग पोलिसांना अवघ्या 24 तासांत उकल करण्यास यश आले. विनयभंगप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला विरारच्या फुलपूर भागातून अटक केली आहे. 


प्रकरण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 19 वर्षीय विद्यार्थिनी परीक्षेला जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकात (Borivali Raiway Station) आली. लोकलची वाट पाहत ही तरुणी एका बेंचवर बसली होती. त्यावेळी आरोपी हा तिच्या बाजूला बसला आणि त्याने तिच्या कंबरेत हात घातला. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने तेथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिचा पाठलाग करत फलाटावर तिला मागून मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे तरुणी गांगारून गेली. मात्र, परीक्षा असल्यामुळे ती परीक्षा केंद्रावर गेली. 


पेपर दिल्यानंतर विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांसह बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्हीच्या मदतीने मिळालेल्या सुगावाच्या आधारे आरोपीला विरार परिसरातून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर आरोपीला 24 तासात अटक केली असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. 


आरोपी हा विविध धार्मिक कार्यक्रमात धार्मिक गीते, भजन गाण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. आरोपी हा मूळचा गुजरात येथील असून सध्या तो विरारमध्ये वास्तव्यास आहे. आरोपीला न्यायलयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. दारुच्या नशेत हे कृत्य झाले असल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बोरिवली रेल्वे पोलीस करत आहेत. 


इतर महत्त्वाची बातमी: