Chhatrapati Sambhaji Nagar Suicide : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक धक्कादायक घटना समोर आली असून, महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने प्रियकरासोबत रेल्वेसमोर उडी घेतली आहे. या तरुणीने सोमवारी सासरच्या घरातून प्रियकरासोबत पळ काढला आणि मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता या प्रेमीयुगुलाने छत्रपती संभाजीनगरातील एकनाथनगर येथे रेल्वेसमोर उडी मारली. दरम्यान या घटनेत प्रियकराचा जागीच मृत्यू झाला असून, प्रेयसी जखमी झाली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर उमेश मोहन तारू (वय 23 वर्षे, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत प्रियकराचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश आणि जखमी तरुणी दोघे मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे रहिवासी आहेत. दरम्यान अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. तर महिनाभरापूर्वी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील एका युवकासोबत तरुणीचा विवाह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी लावून दिला. तिचा पती ठाणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर तरुणी सासरी गेली.  पण उमेश व तरुणीत पुन्हा बोलणे सुरू झाले आणि सोमवारीच उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून छत्रपती संभाजीनगरला पोहचले. येथे लॉजवर राहणार होते. मात्र, तोपर्यंत दोघांच्याही कुटुंबीयांना याबाबत माहिती समजली होती. 


थेट रेल्वेसमोर उडी घेतली


छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉजवर मुक्काम करण्याचा विचार सुरू असतानाच कुटुंबीयांचे फोन सुरू झाल्यामुळे दोघांनी एकनाथनगर परिसरातील रेल्वे पटरी गाठली. तिथे पोहचल्यावर तरुणी फोनवर बोलत असताना रेल्वे आली आणि उमेशने लगेचच रेल्वेसमोर उडी घेतली. यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच तरुणीने देखील रेल्वेसमोर उडी घेतली, पण सुदैवाने ती वाचली. 


पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद 


दरम्यान तरुणीच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची खबर स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून बेपत्ताची नोंद देखील करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेची धडक लागल्याने जखमी झालेल्या तरुणीला उपचारानंतर तिचे कुटुंबातील सदस्य घरी घेऊन गेले आहेत. तर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला आहे. तर, मृत उमेशचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्याचा भाऊ आला होता. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा इशारा