Borewell Water Level : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या काळात अनेक शेतकऱ्यांची मुख्य समस्या असते, ती म्हणजे बोअरला असलेले पाणी कमी होणं किंवा बंद पडण्याची. या समस्येवर सोलापुरातील एका IIT मध्ये शिकलेल्या तरुण अभियंत्याने उपाय शोधला आहे. विशाल बगले असे या तरुण अभियंताचं नाव आहे. या संशोधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्याचे कौतुक केलं आहे. विशालने केलेलं हे संशोधन नेमकं काय आहे? ते कशा पद्धतीने काम करतं ते पाहुयात...
शेतीतला बोअर बंद पडणे किंवा पाणी कमी होणं ही समस्या काय एकाची नाही. संपूर्ण राज्यात हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येवर सोलापुरचा तरुण खनिज अभियंता विशाल बगलेने उपाय शोधला आहे. विशाल बगले यांचे वडील अशोक बगले हे देखील अभियंते होते. ऐरवी पेट्रोलियम कंपनीत वापरल्या जाणाऱ्या केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञनाचा वापर करुन बोअरवेलचे पाणी वाढवता येईल का? यावर त्यांनी संशोधन केलं आहे. याच संशोधनाला पुढे नेत विशाल यांनी मागील 20 वर्षात हजारो शेतकऱ्यांच्या बोअरला जीवनदान दिलं आहे.
काय आहे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान?
केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान ऑईल आणि पेट्रोलियम इंड्रस्टीमध्ये प्रचलित आहे. याच तंत्रज्ञानाचा आधार घेत पाण्याच्या बोअरवेलमध्ये पाणी वाढण्यासाठी केमिकल्स वापरता येईल का? याबाबतची चाचपणी बगले यांनी केली. 2003 साली वेगवेगळे केमिकल्स वापरुन बोअरवेलमध्ये पाणी वाढवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. मागील जवळपास 20 वर्षापासून हजारो बोअरवर ही प्रकिया करण्यात आली आहे. यातील बहुतांश बोअर हे पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. पाणी कमी असलेल्या बोअरमध्ये पाण्याचं प्रमाण 100 टक्के यशस्वी तर पूर्णपणे बंद असलेल्या बोअर पुन्हा सुरु होण्याचे प्रमाण हे 80 टक्के असल्याचा दावा विशाल बगले यांनी केला आहे.
7 ते 10 हजार रुपयांचा खर्च
बोअरवर ही प्रक्रिया करण्यासाठी साधारणात: 7 ते 10 हजार रुपयांचा खर्च येतो. तर एकदा प्रक्रिया केल्यानंतर साधारण दोन ते चार वर्ष पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे विशाल बगले म्हणाले. या प्रक्रियेने बोअरची मोटार आणि केसिंग पाईपला कोणताही धोका नाही. इतर उपलब्ध प्रक्रियेपेक्षा जास्त सोईस्कर आणि कमी खर्चिक प्रक्रिया असल्याचे विशाल बगले म्हणाले.
मंत्री नितीन गडकरींनी केलं कौतुक
लातूरच्या कारेपूरमधील शंकरअप्पा येरुळे आणि मुशिराबादच्या व्यंकट सरोले यांनी काही वर्षांपूर्वी विशाल बगले यांच्याशी संपर्क साधून बोअरवर हे तंत्रज्ञान वापरलं होतं. यामुळं बंद पडलेल्या बोअरला पुन्हा जीवनदान मिळालं. पाण्याचा झरा पुन्हा सुरु झाल्यानं या दोघांच्याही शेतात पुन्हा पिक डोलू लागलं. विशाल बगले यांच्या या संशोधनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?