Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai) 26 वर्षीय कबड्डीपटूच्या हत्येप्रकरणी (Kabaddi Player Murder) तीन जणांना धारावी पोलिसांनी (Dharavi Police) अटक केली आहे. कबड्डीपटू विमलराज नाडर (Vimalraj Nadar) याच्या हत्येप्रकरणी धारावी पोलिसांनी शनिवारी (23 जुलै) मुख्य आरोपीला अटक केली होती. परंतु सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करत शेकडो रहिवाशांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर या हत्येप्रकरणी धारावी पोलिसांनी रविवारी (24 जुलै) आणखी दोन आरोपींना अटक केली. कल्पेश चिटंकडी (वय 32 वर्षे), साईनाथ वाघमारे (वय 30 वर्षे), विकास चौधरी (वय 28 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 


धारावी पोलिसांनी शनिवारी प्रथम मुख्य आरोपी कल्पेश चिटंकडी याला अटक केली होती. तपासातील त्रुटी पाहून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी रविवारी आंदोलन केले. इतर आरोपींना अटक करा अन्यथा मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आणखी दोन आरोपी साईनाथ वाघमारे आणि विकास चौधरी यांना अटक केल्यानंतर कुटुंबाने नरमाईची भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेतला.




धारावीतील 90 फूट रोडवर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडून असल्याची माहिती शनिवारी सकाळी धारावी पोलिसांना मिळाली होती. या जखमी व्यक्तीचं नाव विमलराज नाडर असून तो कबड्डीपटू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जखमी विमलराज नाडरला तातडीने सायन रुग्णालयात नेलं. परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या डोक्याला अनेक जखमा होत्या. नाडर एका केबल कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो आणि त्याच कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करतो.


हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली आणि साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये कल्पेश चिटंकडी आढळून आला. दारुच्या नशेत चिटंकडीने विमलराज नाडरवर अनेक वेळा क्रिकेट स्टंपने हल्ला केल्याचं दिसतं. पोलिसांना तपासादरम्यान असं आढळून आले की पूर्ववैमनस्यातून दोघांचेही संबंध चांगले नव्हते. त्यातूनच विमलराजची हत्या केल्याचं समोर आलं आहे.