सिंधुदुर्ग : भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात (Kunkeshwar Temple) प्रवेशासाठी वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करण्यात आली आहे. अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर वस्त्रसंहिता (Dress Code) लागू करण्यात आली आहे.




वस्त्रसंहितेचं पालन करुन सहकार्य करावं : देवस्थान ट्रस्ट


"श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी भावाना विनम्र आवाहन करण्यात येत आहे. येणाऱ्या भाविकांनी देवस्थानला सहकार्य करुन वस्त्रसंहितेचं पालन करावे. भाविकांनी फाटलेल्या जीन्स किंवा उत्तेजक कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू धर्माचं पालन करुन मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या भाविकांना या निर्णयाविषयी माहिती नसेल त्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे सोय करण्यात आली आहे.  त्यांच्यासाठी पंचा, उपरणे, शाल असे साहित ठेवण्यात येणार आहे, जेणेकरुन कोणताही भाविक दर्शनाशिवाय मागे परतणार नाही. प्रत्येक भाविकाने या निर्णयाचं पालन करुन सहकार्य करावं," अशी प्रतिक्रिया देवस्थान ट्रस्टने दिली आहे.


VIDEO : Kunkeshwar Temple in Sindhudurg : सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात ड्रेसकोड लागू : ABP Majha



कुणकेश्वर मंदिरात 107 शिवलिंग


कुणकेश्वर मंदिर पुरातन पांडवकालीन मंदिर असून याठिकाणी स्वयंभू पिंडी आहे. मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्‍वर येथे 107 शिवलिंगे आहेत. मात्र ही शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे ही ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. गेली कित्येक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत. सध्या केवळ 5 ते  6 ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत. श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इसवी सन अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.