1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
नवी मुंबईतील वाशी येथे लाच प्रकरणात कार्यकारी अभियंत्यालाही अटक करण्यात आली, मुंबईतील रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष, मॅनेजर आणि NOC मागणाऱ्या फर्मचा पार्टनरही अटकेत आहे.

मुंबई : सरकारी खात्यात लाचप्रकरणी सध्या एसीबीकडून जोरदार कारवाया सुरू आहेत. त्यातच, मुंबईतील CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना CBI कडून (CBI) अटक करण्यात आली आहे. वडाळ्यातील भूखंडासाठी NOC देण्यासाठी 1 कोटींची लाच मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या व्यवहारात लाचेची (Bribe) रक्कम 70 लाखांवर ठरली, त्यापैकी 50 लाख रुपये स्वीकारताना आरोपींना अटक करण्यात आली. CPWD अभियंत्याचा नातेवाईक 50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे लाच प्रकरणात कार्यकारी अभियंत्यालाही अटक करण्यात आली, मुंबईतील रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष, मॅनेजर आणि NOC मागणाऱ्या फर्मचा पार्टनरही अटकेत आहे. याप्रकरणात 50 लाख रुपयांची लाच रक्कमही एसीबीकडून जप्त करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना डिस्पॅच रजिस्टरमध्ये नोंद न करता 50 लाखांच्या बदल्यात भूखंडासाठी NOC दिल्याचे तपासात समोर आले. तसेच, उर्वरित 20 लाख रुपये आठवड्यानंतर देण्याचे ठरले होते.
दरम्यान, या कारवाईनंतर एसीबीने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील आरोपींच्या ठिकाणी छापे टाकले असून लाचेच्या 50 लाखांव्यतिरिक्त 53.87 लाखांची रोकड, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली आहे. आत्तापर्यंत याप्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आज मुंबई CBI विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
गोवंडीतही महापालिका अधिकारी जाळ्यात
दरमयान, दोन दिवसांपूर्वीच गोवंडी येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या सफाईचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने लाच देण्यास स्पष्ट नकार देत एसीबीकडे (ACB) धाव घेतली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.






















