मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानींच्या नावाने एक व्हिडीओ (Mukesh Ambani Deepfake Video ) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी हे शेअर ट्रेडिंगसंबंधित बोलताना गुंतवणुकीचा सल्ला देताना दिसतात. पण नंतर हा व्हिडीओ डीप फेक असल्याचं समोर आलं. पण हा व्हिडीओ पाहून मुंबईतील एका डॉक्टरने गुंतवणूक केली आणि त्याची 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं. डॉ. के.एच. पाटील असे पीडित डॉक्टर असून ते पश्चिम मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहेत. 


डॉ. के.एच. पाटील हे आयुर्वेद अभ्यासक आहेत आणि मे महिन्यात त्यांच्या इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोल करत असताना त्यांना एक डीपफेक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी हे राजीव शर्मा ट्रेड ग्रुप नावाच्या ट्रेडिंग अकादमीची जाहिरात करताना दिसत होते. 


फेक व्हायरल व्हिडीओचा बळी


शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला मुंबईतील 54 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टर फसवणुकीचा बळी ठरला. अंधेरीच्या रहिवासी डॉक्टरने इंस्टाग्रामवर एक रील पाहिली होती. या रीलमध्ये मुकेश अंबानी एका कंपनीचे प्रमोशन करत होते. ही रील बनावट असून सायबर चोरांनी डॉक्टरची 7 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.


डॉ. के.एच. पाटील असे पीडित डॉक्टर असून ते पश्चिम मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहेत. डॉ. पाटील, 54, हे आयुर्वेद अभ्यासक आहेत आणि मे महिन्यात त्यांच्या इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोल करत असताना, त्यांना एक डीपफेक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये मुकेश अंबानी राजीव शर्मा ट्रेड ग्रुप नावाच्या ट्रेडिंग अकादमीची जाहिरात करताना दिसत होते. या डीपफेक व्हिडीओमध्ये, अंबानी ट्रेडिंग अकादमीच्या यशाबद्दल बोलत आहेत आणि लोकांना त्यांच्याद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवण्यासाठी BCF अकादमी नावाच्या अकादमीमध्ये सामील होण्यास सांगत आहेत. डॉ.पाटील यांनी 15 एप्रिल रोजी पहिला व्हिडीओ पाहिला.


एफआयआरमध्ये म्हटले आहे की डॉ. पाटील यांनी डीपफेक व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला इंटरनेटवर ग्रुप शोधला. यावेळी त्यांची कार्यालये लंडन आणि मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि अशा प्रकारे त्याने ऑनलाइन संपर्क साधला आणि मे ते जून दरम्यान सुमारे 7.1 लाख रुपये गुंतवले. 


30 लाखांचा नफा दाखवला पण...


त्यानंतर त्यांना एक खाते देखील देण्यात आले होते जिथे गुंतवणूक कशी चालली आहे हे कळू शकणार होतं आणि काही वेळातच त्यांना 30 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा होऊ शकतो असं भासवण्यात आलं. त्यानंतर झालेला 30 लाख रुपयांचा नफा डॉक्टरांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण वारंवार प्रयत्न करूनही ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या काही मित्रांशी संपर्क साधला. मित्रांनी डॉक्टरांना पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.


पोलिसांमध्ये तक्रार दाखल


अंधेरीतील ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून डॉ. पाटील यांनी ज्या सोळा बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते त्याबद्दल अधिक माहितीसाठी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. 


पोलिसांचं आवाहन


लोकांनी नेहमी वैयक्तिकरित्या केलेल्या गुंतवणुकीची पडताळणी करावी आणि शक्य असल्यास फर्मचे तपशील ऑनलाइनच नव्हे तर प्रत्यक्षरित्याही तपासावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


सायबर स्कॅमर्स लोकांना गुंतवणुकीसाठी प्रलोभन देण्यासाठी लोकांचे डीपफेक व्हिडीओ वापरत आहेत. यासाठी त्यांनी ऑनलाइन अकाउंटही तयार केली आहे जी बनावट आहेत. लोकांनी केवळ ऑनलाइन वेबसाइटवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केले आहे. याआधी देखील अनेक गुंतवणूकदारांना व्यवसाय शिक्षण कार्यक्रमासाठी आमिष दाखवण्यासाठी घोटाळेबाजांनी मुकेश अंबानींचा डीपफेक व्हिडीओ तयार केला होता.


ही बातमी वाचा: