T20 World Cup 2024 IND vs BAN: हार्दिक पांड्याच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 196 धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पांड्याशिवाय विराट कोहली, ऋषभ पंत आणि शिवम दुबे यांनी वादळी फलंदाजी केली. बांगलादेशकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. बांगलादेशला विजयासाठी 197 धावांचे आव्हान आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. जसप्रीत बुमराह अॅण्ड कंपनी संध्या भन्नाट फॉर्मात आहे.
रोहित-विराटची आक्रमक सुरुवात -
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो यानं नाणेफेक जिंकत टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या संधींचं भारताने सोनं केले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात दिली. पहिल्या चेंडूपासून दोघांनी आपले इरादे स्पष्ट केले. रोहित आणि विराट यांनी 39 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 11 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान दिले. यामध्ये तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे विराट कोहलीही आक्रमक खेळला.
विराटची शानदार खेळी, तीन षटकार -
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आक्रमक रुप घेत धावसंख्या वाढवली. विराट कोहलीने बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. विराट कोहलीने तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 37 धावांचं योगदान दिले. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंत यानं चार्ज घेतला. पण त्याआधी सूर्यकुमार यादव आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार यादव यादव पक्त सहा धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, पण दुसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
पंतने पुन्हा केली वादळी खेळी -
ऋषभ पंत यानं शिवम दुबेच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दुबे शांत फलंदाजी करत होता, एकेरी-दुहेरी धावा घेत होता. तर दुसरीकडे पंत आक्रमक फलंदाजी करत होता. पंत याने 24 चेंडूमध्ये 36 धावांचा पाऊस पाडला. पंत लयीत दिसत होता, पण रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात त्यानं विकेट फेकली. पंतने आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि चार चौकार ठोकले. पंत बाद झाल्यानंतर दुबे आणि हार्दिकने धावसंख्या हालती ठेवली.
दुबे-हार्दिकचं वादळ -
पंत तंबूत परतल्यानंततर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची पिटाई केली. या दोघांपुढे एकाही बांगलादेशच्या गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात शिवम दुबे बाद झाला. दुबे यानं 24 चेंडूमध्ये 34 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये दुबेने 3 षटकार ठोकले. दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी 34 चेंडूमध्ये 53 धावांची भागिदारी केली. अखेरीस हार्दिक पांड्याने अक्षर पटेलच्या साथीने टीम इंडियाची विराट धावसंख्या उभारुन दिली.
हार्दिक पांड्याचं अर्धशतक -
अष्टपैलू हार्दिक पांड्याने अखेरी षटकांमध्ये वादळी फलंदाजी केली. शिवम दुबेसोबत आधी अर्धशतकी फलंदाजी केली. त्यानंतर अखेरच्या क्षणी अक्षरसोबत धावांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये 17 चेंडूमध्ये नाबाद 35 धावांची भागिदारी झाली, यामध्ये अक्षरचं योगदान फक्त 3 धावांचं होतं. हार्दिक पांड्याने 27 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं. यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्याने 27 चेंडूमध्ये नाबाद 50 धावांची खेळी केली.
बांगलादेशची गोलंदाजी कशी राहिली ?
तंजीम हसन शाकीब यानं चार षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना एकाच षटकात त्यानं तंबूत पाठवले. शाकीब अल हसन याला एक विकेट मिळाली, पण गोलंदाजी महागडी ठरली. त्याने 3 षटकात 37 धावा खर्च केल्या. राशिद हसन यानं दोन फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानं तीन षटकात 43 धावा खर्च केल्या.