पालघर : एकीकडे भारत चंद्रावर पोहोचला असला तरी दुसरीकडे अजूनही काही लोक मुले आणि मुली यांच्यात भेदभाव करतात. महिला आणि मुलींबद्दल होणारा तिरस्कार अजूनही कमी झालेला नाही, हे पुन्हा एकदा उघड झालं आहे. पालघर जिल्ह्यात मातृत्वाला काळीमा असणारी घटना समोर आली आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पाच दिवसांच्या चिमुकलीचा गळा घोटून हत्या केली. मातृत्वाला काळिमा फासणारी ही घटना तारापूर परिसरातील घिवली गावात घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी या निर्दयी मातेने चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकून दिला आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.


मातृत्वाला काळिमा फासणारी घटना


घिवली गावात राहणाऱ्या श्रेया प्रभू या 32 वर्षीय महिलेला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असल्याने तिला तिसऱ्यांदाही मुलाचीच अपेक्षा होती. मात्र, तिसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली. ही मुलगी नको म्हणून या निर्दयी महिलेने सहा दिवसांच्या नवजात चिमुकलीचा स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका प्लास्टिक पिशवी आणि पिवळ्या कुर्त्यात गुंडाळून शाळेच्या बॅगेत भरून तो फेकण्यासाठी सकाळी एसटीने बोईसर रेल्वे स्टेशन आणि तिथून बोईसर ते खार मुंबई येथे माहेरी गेली. या ठिकाणी घरी कोणीच नसल्याने आणि मृत बाळाला फेकण्यासाठी योग्य ठिकाण न मिळाल्याने पुन्हा बोईसरला परत आली. सायंकाळी चारच्या सुमारास वानगाव परिसरातील नदीपात्रात तिने बाळाचा मृतदेह फेकला आणि घर गाठलं.


अशी उघडकीस आली घटना


घिवलीमधील आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी श्रेया प्रभू हिच्या घरी आई आणि नवजात बाळाची तपासणी करण्यासाठी गेले असता, तिथे बाळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी या महिलेनं बाळ नातेवाईकांना दिलं आहे, अशी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, ही महिला काल बाळ घेऊन गेली होती आणि आज एकटीच परत आली, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबत तारापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी या महिलेची कसून चौकशी केली असता तिने मुलीच्या हत्येची कबुली दिली.


कट रचून चिमुकलीची हत्या


श्रेया प्रभूने आईच्या घरी जाणार असल्याचं सांगत नवजात बालिकेची हत्या प्रीप्लॅन करून केली आहे. शेजाऱ्यांना संशय येऊ नये, यासाठी या महिलेने आपण एक महिना मुंबईला आईच्या घरी जाणार आहे, अशी बतावणी केली होती. मात्र, ही महिला ज्या दिवशी गेली त्याच दिवशी पुन्हा परत आली. तिच्याबरोबर मुलगी नसल्याने शेजाऱ्यांचा संशय बळावला. त्यातच आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी आले असता, या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Crime News : डॉक्टर..डॉक्टर खेळू सांगत 12 वर्षाच्या मुलीवर 18 वर्षीय मुलाचा अत्याचार