गोंदिया : 'शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करु,' असे वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "संजय राऊत हे 103 दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात," असं चित्रा वाघ म्हणाल्या. 'मेरी माटी मेरा देश' (Meri Mati Mera Desh) या अभियानासाठी गोंदिया जिल्ह्यात आल्या असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांचे चेहऱ्यावर स्माईल आणणारं सरकार आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. 


स्वातंत्र्याची 75 वर्षे भारतीय संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठी 'मेरी माटी मेरा देश' हा उपक्रम भारत सरकार राबवत आहे. चित्रा वाघ यांनी देखील आज गोंदियात जाऊन भरपावसात 'मेरी माती मेरा देश' या उपक्रमासाठी माती संकलित केली. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी सपत्नीक तर भाजपचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या पत्नीने देखील या माती कलशात माती टाकून देशाप्रति आपली भावना व्यक्त करत मेरी माती मेरा देश या उपक्रमाचे स्वागत केले आहे. 


'आम्ही उद्धव ठाकरेंना जोकरचे कपडे पाठवले'  


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरीरावरुन टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे पाठवले होते. त्यावर चित्रा वाघ यांना प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या की, एखाद्या नेत्याच्या शरीरावरुन टीका करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमचे नेत्यांच्या टिवल्या-बावल्या करतात आणि महाराष्ट्रात लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे जोकर करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे आम्ही पाठवले. तसंच आमच्या नेत्यांबद्दल टिप्पणी केल्यास 'अभी तो बहुत बाकी है' म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.


'ज्यांनी मराठा आरक्षण दिलंच नाही, त्यांनी वल्गना करु नये'


या राज्यावर 40 वर्षे मराठा नेते राज्य करत होते. मराठ्यांना कोणी आरक्षण दिलं नाही.  मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्या त्या अडीच वर्षात हायकोर्टात हे आरक्षण टिकवू शकलेले नाहीत, ज्यांनी कधी दिलंच नाही त्यांनी अशा वल्गना करु नये, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.


हेही वाचा


Chitra Wagh : उद्धवराव, पोपट ते रडतं राऊत; चित्रा वाघ गरजल्या-बरसल्या