मुंबई : ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) आणि सायबर गुन्हे (Cyber Crime) सरकारसाठी चिंतेचा विषय बनला असून त्यांच्यावर आता केंद्र सरकारकडून मोठी कारवाई होणार आहे. देशात 18 लाखांहून अधिक संशयास्पद सिम बंद होणार आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्या सरकारला सहकार्य करणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा संशयास्पद सिमची या आधीच तपासणी केली होती. या सिमकार्डच्या मदतीने अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे आढळून आले.


एकाच मोबाईलमध्ये हजारो सिम वापरल्या गेले


इकॉनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, तपासादरम्यान अशा प्रत्येक मोबाईलमध्ये हजारो सिमकार्ड वापरले जात असल्याचे आढळून आले. दूरसंचार विभागाने 9 मे रोजी कंपन्यांना आदेश दिले होते की, 28,220 मोबाईल फोन आणि सुमारे 20 लाख सिमकार्डचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 18 लाख सिम आणि हजारो मोबाईल फोन प्रभावित होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मोबाईल फोन आणि सिमकार्डच्या मदतीने अलीकडच्या काळात अनेक मोठे आर्थिक गुन्हे घडले आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.


2023 मध्ये 10,319 कोटी रुपयांचा गंडा


नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) नुसार, 2023 मध्ये सायबर गुन्ह्यातील पीडितांना सुमारे 10,319 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संसदेच्या एका समितीने सांगितले होते की, 2023 मध्ये आर्थिक गुन्ह्यांच्या सुमारे 6.94 लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि टेलिकॉम कंपन्या टाळण्यासाठी, फसवणूक करणारे भामटे हे इतर टेलिकॉम सर्कलमध्ये जातात आणि सिम कार्ड वापरतात. तसेच एकाच फोनमध्ये अनेक सिम बदलत राहतात. हे लोक काही कॉल केल्यानंतरच सिम बदलतात.


गेल्या वर्षी 2 लाख सिम बंद करण्यात आले


गेल्या वर्षीही टेलिकॉम कंपन्यांनी सायबर गुन्ह्यांशी संबंधित 2 लाखांहून अधिक सिम बंद केले होते. यानंतर हरियाणातील मेवातमध्ये जवळपास 37 हजार संशयास्पद सिम ब्लॉक करण्यात आले. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना वेळोवेळी संशयास्पद सिमवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


ही बातमी वाचा: