मीरा भाईंदर : मीरा रोडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.  कमी किंमतीत सोनं मिळतं म्हणून या बिल्डरने तीन कोटींचं सोनं घेतलं. पण घरी आल्यावर ते पितळ  निघाले. त्यामुळे बिल्डरच्या पायाखालची जमीनच सरकरली. बिल्डरने पोलिसांकडे धाव आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.  मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे.


18 एप्रिलला मुंबई हायवेवर डोंबिवलीतील एका बांधकाम व्यवसायिकाला 70 किलो बनावट सोनं देऊन, या व्यावसायिकाकडून 3 कोटी 12 लाखांची रोकड घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती आणि फसवणूक करून हे आरोपी फरार झाले. बिल्डरने पोलिसांकडे धाव आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तपासाचे सूत्र हलवत दोन महिन्यांत बिल्डरला लुटणाऱ्यांना गुजरात आणि मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या. 


मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना गुजरात आणि मध्य प्रदेशातून अटक केली आहे. या आरोपींकडून 2 कोटी 19 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. किसन कस्तूर मारवाडी,  हिरा प्रेमा मारवाडी आणि मनीष कमलेश शाह अशी या तीन आरोपींची नावे असून ते गुजरात राज्यातील बडोदरा शहरात वास्तव्यास आहेत. हे आरोपी लोकांना आम्हाला उत्खन्नात भरपूर सोनं सापडलं आहे असं सांगून प्रथम खरे सोने देऊन त्यांचा विश्वास जिंकतात आणि त्यानंतर त्यांना बनावट सोनं देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे चौकशीतून समोर आलं आहे.


डोंबिवलीत पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 56 लाखांची फसवणूक


झटपट पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी अंधश्रद्धेच्या आहारी जात डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक तब्बल 56 लाख रुपये गमावून बसल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांना पैशांचा पाऊस पाडून पाच कोटी मिळवून देतो असे आमिष दाखवत तांत्रिक टोळीने त्यांची 56 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. अशोक गायकवाड, रमेश मुकणे, संजय भोळे याच्यासह एकाला ताब्यात घेतलं आहे.