Govinddas Shroff : भारतीय स्वातंत्र्य लढ्या बरोबरच मराठवाड्यातील आणि आंध्र प्रदेशातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावणाऱ्या गोविंदभाई श्रॉफ (Govinddas Mannulal Shroff) यांची आज जयंती. गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी झाला. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे प्रमुख समर्थक म्हणून गोविंदभाई यांना ओळखले जात असे. एवढेच नाही तर कोणताही मुख्यमंत्री किंवा केंद्राचा मंत्री चिकलठाणा विमानतळावर उतरल्यानंतर गोविंदभाईं यांच्या घरी गेल्याशिवाय ते पुढील कार्यक्रमाला जात नसत. 


गोविंदभाई यांनी संपूर्ण हायातभर मराठवाड्याच्या विकासासाठी काम केले. मराठवाड्यातील कोणताही प्रश्न असला तरी त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र आणून तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम गोंदभाई करत, अशी आठवण विदर्भाचे शेतकरी संघटना अध्यक्ष धनंजय मिश्रा सांगतात.    


कट्टर विरोधकांना एकत्र आणण्याची किमया
धनंजय मिश्रा सांगतात, "मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांवर गोविंदभाई यांनी रस्त्यावरील लढाई लढली आहे. सर्वांनी एकत्र आले तर मराठवाड्याचा विकास होईल अशी भूमिका गोविंदभाई यांची होती. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर कट्टर विरोधकांना देखील एकत्र आणण्याची किमया गोविंदभाई यांच्यात होती. एकदा नागपुरात विधानसभेच्या अधिवेशनावेळी त्यांनी नागपुरात जाऊन सर्व लोकप्रतिनीधींची मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली आणि विधानसभेत या प्रश्नांवर आवाज उठवा असे सांगितले. त्यानंतर आमदरांनी अधिवेशानात मराठवाड्याचे सर्व प्रश्न मांडले.  


स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण सोडलं
राजकारणातील त्याग, सचोटी, समर्पण आणि चिकाटी म्हणजे गोविंदभाई. महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालत त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवला.  औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये गेले. मद्रास विद्यापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी गोविंदभाईंनी  शिक्षण स्थगित केले होते. 


शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान
गोविंदभाई यांनी शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. औरंगाबादची श्री सरस्वती शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि आंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थांचे ते मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. याबरोबरच मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. 


हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे एक महत्वाचं पर्व मानलं जातं. या काळात अनेक लोकांनी क्रांतिकारी पाऊलं उचलली. ज्यावेळी इंग्रजांविरोधात बोलायला कुणी धजावत नव्हतं तेव्हा स्वातंत्र्यसैनिकांनी सशस्त्र क्रांती घडवून आणायला गोविंदभाई यांनी हातभार लावला होता.