Mira Road Crime News: मुंबईतील (Mumbai News) मिरारोड (Mira Road News) परिसरात घडलेल्या निर्दयी घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. तसेच, त्यांनी ट्वीटसोबत महाराष्ट्र महिला आयोगाचं एक पत्रही जोडलं आहे. हे पत्र मिरारोडमधील घटनेसंदर्भात असून दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागांने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असं महिला आयोगानं पत्रात म्हटलं आहे. 


रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, "सदरील घटना ही अंगावर शहारे आणणारी व संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आहेत.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागांने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.आणि सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा." तसेच, रुपाली चाकणकर स्वतः या संदर्भात पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


नेमकं काय घडलं मिरा रोडमध्ये? 


मिरा-भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी असणाऱ्या गीता आकाश दिप बिल्डिंगमधील रुम नंबर 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यात मनोज साने (वय 56) आणि मृत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघं राहत होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. 


पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले.  


हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. दरम्यान, महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी हा फ्लॅट उघडला आणि त्यानंतर जे धक्कादायक चित्र समोर आलं ते पाहुन सर्वांनाच धक्का बसला. सध्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :