Pune Crime : पुण्यात (Pune) महिलांच्या छेडछाड (Molestation) प्रकरणी "झेप्टो" कंपनीच्या मॅनेजरसह पाच डिलिव्हरी बॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयात ये-जा करणाऱ्या महिलांची छेडाछाड काढल्याप्रकरणी झेप्टो कंपनीचे सूरज गायकवाड, स्टोअर मॅनेजर मोईन हन्नुरे आणि इतर अनोळखी चार ते पाच डिलिव्हरी बॉय यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सगळ्यांविरोधात मंगळवारी (6 जून) उशिरा भारतीय दंड संहितेच्या कलम 354A, 354D, 509, 107, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 


दीड वर्षांपासून छेडछाडीचा प्रकार


48 वर्षीय महिलेने याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीनुसार, महिला काम करत असलेल्या ऑफिसच्या इमारतीच्या खाली झेपटो कंपनीचे गोदाम आहे. त्याठिकाणी तक्रारदार आणि त्यांच्या सहकारी महिलांसोबत कामावर येत-जात असताना, झेप्टो कंपनीचे मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजर तसंच डिलिव्हरी बॉय त्यांची छेड काढत होते. इथे काम करणाने सर्व जण तक्रारदार महिलेसह इतर महिलाबाबत अश्लील भाषेचा वापर करत असत. तसंच घरापर्यंत पाठलाग करुन जाणीवपूर्वक महिलांसमोर कपडे बदलत असत. हा सगळा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरु होता.


डिलिव्हरी बॉईजचा महिला कर्मचाऱ्यांना त्रास


पुण्यातील विमाननगरमधल्या लालवानी प्लाझा इथे विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये सुमारे 150 महिला काम करतात. झेप्टोचे गोडाऊन आणि कार्यालय तळमजल्यावर असल्याने, डिलिव्हरी बॉईज जमतात आणि महिलांना पाहून गैरवर्तन करतात, मग त्यांचं वय कितीही असो. शहरात किराणा आणि भाजीपाला वितरण सेवा पुरवणाऱ्या झेप्टोच्या गोदामातून डिलिव्हरी बॉय सामान घेण्यासाठी येतात. इथल्या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या महिलाच नव्हे, तर या याच आवारातील निवासी इमारतीतील महिलांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.


"किमान 50-60 डिलिव्हरी बॉय इथे येतात. दुचाकी पार्क करुन ते जागा अडवतात. अश्लील भाषेत शेरेबाजी, महिलांचा विनयभंग करण्यासोबतच त्यांच्या मोबाईल फोनवर मोठ्याने गाणी वाजवतात तसंच व्हिडीओ शूट करतात," असं इथल्या महिला कर्माचाऱ्यांनी सांगितलं.


...तर आणखी गुन्हे नोंदवले जातील : पोलीस


"आम्ही कार्यालयांना भेट दिली आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांशी बोललो. त्यातील काही महिलांनी छेडछाड झाल्याचं सांगितलं. आम्ही त्यांना आमचे मोबाईल नंबर दिले आहेत आणि त्यांना डिलिव्हरी बॉईजकडून काही अडचणी आल्यास फोन करण्यास सांगितले आहे. तसंच आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. मारहाण किंवा छेडछाडीची कोणतीही घटना दिसल्यास आणखी गुन्हे नोंदवले जातील, असं पोलिसांनी सांगितलं.


झेप्टोने काय म्हटलं?


दरम्यान या प्रकरणावर झेप्टोने आपली बाजू मांडली आहे. "झेप्टोसाठी सुरक्षितता आणि सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आम्ही सर्व डिलिव्हरी बॉईज आणि स्टाफ कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी कठोरपणे पडताळतो आणि त्यांना प्रशिक्षण देतो. या बाबीकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. स्थानिक यंत्रणेसोबत आम्ही या घटनेचा सखोल तपास करत आहोत," असं झेप्टोने म्हटलं आहे.