रत्नागिरी : राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. बदलापूरमध्ये शालेय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती, त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळल्याचं आपण पाहिलं. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यात लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. याप्रकरणी, पोलीस प्रशासनही गंभीर बनलं असून आरोपींवर कारवाई केली जात आहे. मात्र, या घटनांना आळा बसताना दिसून येत नाही. एकीकडे नवरात्री (Navratri) उत्सव साजरा होत असताना, महिलांनीच आज दुर्गा, कालिका बनून स्वत:चं रक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यातच, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील काही मुलींच्या धाडसी कृत्यातून हा धडा समाजाला मिळालाय. तसेच, एक आदर्शही त्यांनी इतर मुलींपुढे उभा केलाय, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. 


रत्नागिरी जिल्ह्याील दापोली येथे कॉलेजच्या विद्यार्थींनी आदर्शवत काम केलं असून त्यांच्या या धाडसाचं कौतूक होत आहे. एका मुलीची छेड काढणाऱ्या कंडक्टरला तिच्या मैत्रिणींनी चांगलंच धुतलंय. दापोली-पंचंनदी बसमध्ये चढलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे. या विद्यार्थींपैकी एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगलंच सुनावल आणि धोपटलंही आहे. मुलींचा हा रौद्रअवतार पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली होती, बस थांबवून कंडक्टरला चोप दिल्यामुळे दाभोळमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मर्दानी बनून मुलीने कंडक्टरला चांगलाच धडा शिकवलाय. तसेच, याप्रकरणी कंडक्टरची दाभोळ पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


सांगलीत आरोपीचं घर भुगा


सांगलीतील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, यानंतर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाची  देखील संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड केली आहे. 28 वर्षीय तरुणाने 9 वर्षाच्या मुलीवर ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिक संतप्त झाले होते. आरोपी तरुणास संजयनगर पोलिसांनी अटक करत आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.


हेही वाचा


केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी