Manipur Violence News : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील जातीय हिंसाचाराचं लोण संपण्याचं नाव घेत नाहीय. गुरुवारी जमावाने मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 28 सप्टेंबर रोजी जमावाने मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या कुटुंबाच्या रिकाम्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, यावेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवलं.


मुख्यमंत्र्यांच्या संबंधितांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न


एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंफाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांनी जमावाला घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर रोखले. अधिका-याने सांगितले की आता घरात कोणीही राहत नाही, जरी ते कडक सुरक्षेखाली आहे.


विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली


जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे सोमवारी 25 सप्टेंबर रोजी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा तणाव पसरला. दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने केली. गेल्या चार दिवसांपासून आंदोलने आणि प्रदर्शने सुरु आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हिंसाचार उसळलेल्या भागांत 'शांतता' असल्याचं मणिपूर सरकारनं घोषित केलं आहे.


1 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट बंद


जमावाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाची तोडफोड केली आणि दोन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. 28 सप्टेंबरला पहाटे ही घटना घडली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. निदर्शनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्या जाळल्या. दरम्यान, हिंसाचार उसळल्याने मणिपूरमध्ये 1 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.


दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर निदर्शने सुरूच


दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमध्ये चार दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. गुरुवारी संतप्त जमावाने इंफाळ येथील मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या खाजगी घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जमावाला घराच्या 500 मीटर आधी अडवले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या मुख्यमंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


जमावाकडून जाळपोळ करण्याचा प्रयत्न


याआधी बुधवारी आंदोलकांनी थोबुल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला आग लावली होती. दुसरीकडे, इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. याशिवाय इंफाळ पश्चिम येथील उपजिल्हाधिकार्‍यांच्या घराची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला! जमावाने पोलिसांच्या गाड्या पेटवल्या, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट