Manipur Violence : मणिपूर (Manipur) मध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये मागील पाच महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरु असून अद्यापही मणिपूरमध्ये हिंसाचार कायम आहे. सप्टेंबर महिन्यात पुन्हा हा हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूरमध्ये 27 सप्टेंबरला बुधवारी जमावाने एका नेत्याच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसांची गाडीही जाळली. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, काही भागांमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला आहे.


मणिपूरमध्ये हिंसाचार कायम


जुलै महिन्यामध्ये दोन तरुण बेपत्ता झाले होते, 25 सप्टेंबर रोजी या तरुणांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर हा हिंसाचार पुन्हा उफाळून आला. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी प्रदर्शनं करण्यात येत आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आंदोलकांनी निदर्शनं करत घोषणाबाजी केली आणि काही नेत्यांच्या घरावर हल्लाही केली. कागी ठिकाणा जमावाने पोलिसांच्या गाड्या जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकाड्यांचा वापर केला. जमावाने बुधवारी अनेक ठिकाणी निदर्शनं केली.






पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट


जखमी आंदोलकांबाबत मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं की, "जर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळ्या किंवा कोणत्याही प्राणघातक शस्त्राचा वापर केला असेल, तर सरकार ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. आंदोलकांना गंभीर दुखापत झाल्यास, चौकशी केली जाईल आणि संबंधितांना न्यायच्या कक्षेत आणले जाईल.'' सुरक्षा दलांवर लोखंडी वस्तू फेकल्या गेल्या, ज्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले, अशी माहिती मिळाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


इंटरनेट सेवा पुन्हा बंद


मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी पुन्हा इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, पुन्हा हिंसाचार सुरु झाल्याने प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. 1 ऑक्टोंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन


गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्याशी फोनवर चर्चा केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी बुधवारी सांगितलं की, केंद्रीय अन्वेषण एजन्सी सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर यांच्या नेतृत्वाखाली एजन्सीच्या अधिकाऱ्यांचं पथक आलं आहे. या पथकाने बेपत्ता झालेल्या दोन तरुणांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Supreme Court : मणिपूर हिंसाचारातील सीबीआय चौकशीची प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय