Cyber Fraud Fastag :  गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यात (Cyber Fraud) मोठी वाढ झाली आहे. आता, एक नवीन सायबर गुन्ह्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Crime) लोकांना फसवण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. नुकतेच कर्नाटकात एका व्यक्तीची सुमारे 1 लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आता फास्टॅग रिचार्ज करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


काय आहे प्रकरण?


फ्रान्सिस 29 जानेवारी रोजी उडुपीहून मंगळूरला आपल्या कारमधून जात होते. हेजमाडी येथील टोल प्लाझावर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या फास्टॅग अकाउंटमध्ये कमी रक्कम आहे. त्यानंतर त्यांनी इंटरनेटवर हेल्पलाइन नंबर शोधण्यास सुरुवात केली. त्यांना एक हेल्पलाइन क्रमांक मिळाला. हा क्रमांक FASTag हेल्पलाइन असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी या क्रमांकावर कॉल केल्यानंतर त्यांना समोरील व्यक्तीने स्वत: ची ओळख पेटीएममधील फास्टॅग प्रतिनिधी असल्याची सांगितली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. 


एक लाखाचा बसला फटका


FASTag रिचार्ज करण्यासाठी, त्याने फ्रान्सिसला वन-टाइम पासवर्ड विचारला. फ्रान्सिस यांनी त्याला ओटीपी सांगितला. त्यानंतर काही मिनिटांतच फ्रान्सिस यांना एकामागून एक व्यवहाराचे मेसेज येऊ लागले. पहिल्यांदा त्यांना  अकाउंटमधून 49 हजार रुपये खर्च झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर 19,999 रुपये, 19998, 9,999 आणि त्यानंतर 1000 रुपये खर्च झाल्याचा मेसेज आला. अशा प्रकारे फ्रान्सिस यांना 99, 997 रुपयांचा फटका बसला. 


फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फ्रान्सिस यांनी तातडीने सायबर फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, फसवणूक करणाऱ्याने फ्रान्सिसला अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्यातून पैसे कापले गेले. 


फिशींग स्कॅमचे बळी


लोकांची फसवणूक करण्यासाठी, सायबर गुन्हेगार बनावट वेबसाइट तयार करतात ज्या वास्तविक वेबसाइटसारख्या दिसतात. या वेबसाइट्समध्ये लोकांचे डिव्हाइस हॅक करणाऱ्या लिंक्स असतात. फ्रान्सिसच्या बाबतीत, त्याने बनावट वेबसाइटवर क्लिक केले आणि त्या वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. सायबर गुन्हेगार सावजाच्या शोधात असतात आणि फ्रान्सिस त्यांच्या जाळ्यात अडकले. 


सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा


सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. मात्र, तरीदेखील अनेकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. कोणालाही ओटीपी, डेबिट-क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्डची माहिती देऊ नये. एखाद्या संशयास्पद फोन कॉलची माहिती तुम्ही सायबर पोलिसांना देऊ शकता. त्याशिवाय, व्हॉट्सअॅप, एसएमएसवरील लिंकवर क्लिक करू नये. यातून तुमचा मोबाइल स्कॅन होऊन सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.