Dharavi Incident: मुंबईच्या धारावी (Dharavi) परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने सोबतच्या महिलेच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या व्यक्तीने त्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना या धारावी परिसरात घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी नंदकिशोर पटेल नावाच्या 41 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून सांगितलं जात आहे की, नंदकिशोर ज्या महिलेसोबत राहत होता ती महिला आणि तिची मुलगी त्याचं ऐकत नसल्याने रागाच्या भरात त्याने मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं?
नंदकिशोर ज्या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता ती महिला आणि तिची मुलगी दोघीही नंदकिशोरचं काहीही ऐकत नसल्याचं सांगण्यात येत आहे. या रागामध्ये नंदकिशोरने हे कृत्य केल्याचं देखील म्हटलं जात आहे. मंगळवारी काही कामानिमित्त ही मुलगी बाहेर पडली होती. तेव्हा तिने समोर उभ्या असलेल्या नंदकिशोरला पाहिले. त्यावेळी नंदकिशोरने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला आगीच्या भक्ष्यस्थानी दिले. त्यानंतर नंदकिशोरने तिथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांना जसा हा प्रकार लक्षात आला तसं त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. परंतु तोपर्यंत ती मुलगी चांगलीच भाजली होती.
त्यानंतर तिला तात्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून ती 60 ते 70 टक्के भाजली असल्यानं तिची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच कलम 307 नुसार हत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या कलमांतर्गत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तसेच आता धारावी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून आरोपीची पूर्वीची पार्श्वभूमी शोधून काढण्याचे काम पोलिसांकडून सध्या करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईसह उपनगरांमध्येही महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.